Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

किल्ले अहिवंतगड – सातमाळ डोंगररांगेतील एक बलाढ्य दुर्गरत्न

ahivantgadनाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वपश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगररांगेमध्ये एकुण १८ किल्ले आहेत. ह्यापैकी एक प्रमुख किल्ला म्हणजे अहिवन्तगड. नाशिक शहरापासुन अहिवंतगडास एका दिवसात भेट देणे सहज शक्य आहे. अंतर आहे सुमारे ५५ किमी. पुण्यामुंबईच्या दुर्गप्रेमींनी आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याला असलेल्या दरेगावतील हनुमान मंदिरात मुक्काम करावा आणि भल्या पहाटे किल्ल्याकडे कुच करावे.

दरेवाडी गावातुन किल्ल्यावर जायला दोन प्रमुख वाटा आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या मागील वाटेने सुमारे दीड तासात गडमाथा गाठता येतो. ह्या मार्गात खडकात खोदलेल्या पायऱ्या आणि एका बुरुजाचे बांधकाम दिसते. ह्या पायऱ्यांवर नेहमी मुरमाड माती पडलेली असल्याने इथून काळजीपूर्वक चढावे लगते. या तुलनेने दुसरा मार्ग खुप सोपा आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले बेलवाडी आणि दरेगाव ह्या गावांना जोडणारी खिंडीची वाट अहिवन्तगडाला खेटूनच जाते.

ahivantgad cavesह्या मार्गाने जाताना किल्ल्याच्या साधारण अर्ध्या उंचीपर्यत गाडीने जाता येते. सुमारे ३०४० मिनिटांच्या सोप्या चढणीने गडमाथ्यावर प्रवेश होतो. ह्या मार्गाने किल्ल्यावर जाताना वाटेत खडकात खोदलेल्या पायऱ्या, दरवाजा आणि देवड्यांचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्याचा मोठा विस्तार, गडमाथ्यावर असलेले वाड्याचे, धान्य कोठाऱ्यांचे अवशेष, कातळातील खोदीव अनेक गुहा, घोड्याची पागा, दोन मोठाली तळी हे सर्व दुर्गावशेष हे सिद्ध करतात कि अहिवन्तगड एक प्रमुख लढाऊ किल्ला होता.

ahivantgad hexagonal watertankकिल्ल्यावर एक अष्टकोनी आकाराचे छोटेसे पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यायोग्य आहे. ह्या टाक्याशेजारी एक अश्वारूढ खंडोबाची मूर्ती दिसते तसेच गडाच्या मधोमध एक हनुमानाची आणि वणीच्या सप्तशृंगीमाते प्रमाणे अष्टभुजा देवीची मुर्ती आहे. घोड्यांच्या पागेमधील घोड्याचे दावे बांधण्यासाठी डोंगरामध्ये कोरलेल्या खोबण्या, तलावांचे पाणी उताराकडे वाहुन जाऊ नये म्हणुन पाण्याला घातलेला बांध असे मुद्दाम अभ्यासपूर्वक पहावेत असे दुर्गावशेष अहिवंतगडावर पहायला मिळतील. सर्व दुर्गावशेषांसोबत गड फिरायला सुमारे तीन तास तरी नक्की लागतात.

मोघलांच्या ताब्यात असलेला अहिवंतगड छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये स्वराज्यात शामील केला. मराठ्यांनी मोघलांचे इतर अनेक किल्ले जिंकले नन्तर सुरतेवर हल्ला करून सुरत लुटली. या कारवायांनी संतप्त झालेल्या औरंगजेबाने महाबतखान या सरदाराला किल्ले परत मिळवण्याचा हुकूम केला. महाबतखानाने दिलेरखानासोबत अहिवंतगडाला वेढा दिला. महाबतखानाने किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने आणि दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे बांधणी केली. सुमारे एक महिना उलटला तरी अहिवंतगड मोघलांना दाद देत नव्हता. तेव्हा एखाद्या दन्तकथेत शोधावी अशी घटना घडली.

दिलेरखानाच्या छावणीत एक ज्योतिषी आला. अहिवंतगड कधी ताब्यात येईल असे ज्योतिषाला विचारल्यावर त्याने साखरेने किल्ल्याचा नकाशा काढला आणि महाबत दिलेरचे मोर्चे देखील काढले. ज्योतिषाने आपल्या जबळील पेटीतून एक मुंगळा काढून नकाशावर सोडला. मुंगळा प्रथम महाबतखानाच्या मोर्चाकडे गेला पण लगेच मागे वळुन दिलेरखानाच्या मोर्चाकडे गेला आणि तिथून किल्ल्याकडे वळाला.

Ahivantgad old watertankयावरून ज्योतिषाने असे भाकीत केले कि महाबतखानाकडून किल्ल्याच्या महादरवाजच्या बाजुने चिवट हल्ला होईल मात्र किल्ला अखेर दिलेरखानाच्या ताब्यात होईल.ज्योतिषाची हि भविष्यवाणी सहा दिवसांनीच खरी ठरली. किल्ल्यातील दारुगोळा आणि धान्य संपत आल्यामुळे मराठ्यांनी किल्ला मोघलांच्या ताब्यात द्यायचे ठरवले. महाबतखान अतिशय तीव्र त्वेषाने हल्ला करत असल्यामुळे मराठ्यांनी आपला दूत दिलेरखानाकडे पाठवुन किल्ला सुपूर्त केला.

अहिवंतगड एक प्रमुख किल्ला असल्यामुळे मोघल मराठ्यांमध्ये किल्ला ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच संघर्ष घडत गेला. अखेर १८१८ साली किल्ला इंग्रजांनी जिंकला. दोन दिवसांचे वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोहनदरी आणि अचला हे अहिवंतगडाचे संरक्षक दुर्गसाथीदार देखील पाहता येतील. किल्ल्याचा मोठा विस्तार आणि अनेक अभ्यासयुक्त दुर्गावशेष गडावर उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी अहिवंतगडास नक्की भेट द्यावी.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *