२८ एप्रिल १७४० – वैशाख शुद्ध त्रयोदशी.
ठिकाण – रावेरखेडी, माळवा सुभ्यातील एक छोटेसे खेडेगाव.
पण ह्या छोट्याश्या खेडेगावला एका लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. सुमारे एक लाख मराठी लष्कराचे असंख्य तंबु, राहुट्या आज येथील नर्मदा नदीच्या तीरावर उतरले होते. त्यांच्या सोबत असलेल्या अनेक जातीवन्त अरबी घोडयांच्या टापांमुळे धरणीला कंपने सुटत होती. महाकाय हत्तीच्या चित्काराने आसमंत दणाणून गेला होता. मराठी सैन्यातील शूरवीरांच्या तलवारी धार लावुन रणभूमी गाजवण्यासाठी आसुसल्या होत्या. अनेक बलाढ्य तोफा आ वासून शत्रू सैन्य गिळंकृत करायला सज्ज होत्या. ह्या प्रचंड सेनासागराचे सामानसुमान वागवण्यासाठी बैलं, उंट अशी अनेक जनावरे तैनात होती. कित्येक नोकरचाकर, बाजारबुणगे सेवेस हजर होते. ह्या सर्वांमुळे आज रावेरखेडीचे चित्रच पालटून गेले होते.
कित्येक मैलोन-मैल पसरलेल्या ह्या लष्करी छावणीच्या मधोमध एका शामियानामध्ये बसुन पुढील रणनीती आखण्यात व्यग्र होता ह्या प्रचंड सैन्याचा सेनानायक महापराक्रमी, अजिंक्ययोद्धा बाजीराव बल्लाळ भट, अर्थात श्रीमंत बाजीराव पेशवे.
कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणाला शोभेल असा तजेलदार गौरवर्ण, व्यायाम करून कमावलेली बलदंड पिळदार शरीरयष्टी, रुबाबदार पल्लेदार मिशा, केवळ एका कटाक्षाने समोरील व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारे पाणीदार नेत्र, पेशवेपदाची उंची वस्त्रे परिधान करून मराठी सैन्याची घोडदौड सांभाळणारे बाजीराव पेशवे. अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या पेशवेपदाची जवाबदारी समर्थपणे पेलून मराठयांचा साम्राज्यविस्तार करणारे बाजीराव पेशवे. माळवा, गुजरात, राजपुताना, दुआबा, बुंदेलखंड यासारखे मुख्य सुभे जिंकून मराठी साम्राज्याची सीमा दिल्ली पर्यंत जोडणारे बाजीराव पेशवे. निजाम, हैदर अली, महंमदखान बंगष, पोर्तुगीज, सिद्दी अशा कित्येक बलाढ्य शत्रूंना दाती तृण धरत शरण यायला लावणारे बाजीराव पेशवे. उण्यापुऱ्या वीस वर्षाच्या पेशवे पदाच्या कारकिर्दीत तब्बल बेचाळीस लढाया करून प्रत्येकवेळी अजिंक्य राहिलेले बाजीराव पेशवे.
मात्र २० एप्रिल १७४० साली अचानक उष्माघात आणि तापाने आजारी पडुन बाजीरावांची तब्येत खालावत गेली. अखेर २८ एप्रिल १७४० साली रावेरखेडीच्या ह्या नर्मदेच्या वाळवंटामध्ये मुक्कामी असताना ह्या अद्वितीय अपराजित योध्दयाचे निधन झाले. मात्र दुुःखाची बाब अशी कि रावेरखेडी हे मध्यप्रदेश मधील छोटेसे गाव आणि तेथील बाजीरावांची समाधी आजदेखील महाराष्ट्राच्या जनतेला अपरिचितच आहे. महाराष्ट्रापासून कित्येक किलोमीटर लांब असलेले बाजीराव पेशव्यांचे समाधी स्मारक आजही मराठी लोकांना अन्यात आहे.
ग्वालियरच्या सिंधिया घराण्यातर्फे बाजीरावांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आहे. समाधीचौथऱ्याच्या चहुबाजूने मजबुत तटबंदीचे बांधकाम केले असुन परिसरात एक छोटेसे हनुमानाचे आणि रामाचे मंदिर आहे. शेजारूनच वाहणाऱ्या विस्तीर्ण नर्मदा नदीपात्रामुळे स्मारकाच्या सौन्दर्यामध्ये भरच पडली आहे. रावेरखेडी गावला भेट देण्यासाठी मध्यप्रदेश मधील इंदोर शहर गाठावे. इथून केवळ ९० किलोमीटर अंतरावर रावेरखेडी असून इंदोर पासून एका दिवसात बाजीरावांचे समाधी स्मारक बघता येईल. स्वतःचे वाहन असल्यास इंदोर पासून पुढील मार्गाने रावेरखेडी पर्यंत जावे. इंदोर – सनावद – बेडिया – रावेरखेडी. दोन-तीन दिवसांच्या इंदोर सहलीचे योग्य नियोजन केल्यास रावेरखेडी सोबतच मांडवगड नावाचा एक जुना किल्ला, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला माहेश्वरी किल्ला, बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैन येथील ओंकारेश्वर मंदिर हि ठिकाणे देखील पाहता येतील.
काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश सरकारने नर्मदा नदीवरील माहेश्वरी धरण प्रकल्प घोषित केला आहे. जर हा धरण प्रकल्प बांधून पूर्ण झाला तर रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तरी अनेक सामाजिक संथांनी ह्या विरुद्ध आवाज उठवला असून बाजीरावांच्या समाधीचे जतन व्हावे ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जशी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर प्रत्येक मराठी व्यक्तीने नतमस्तक व्हायलाच हवे तसेच शिवाजी महाराजांचे अखंड अखंड हिंदवी साम्राज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीवर देखील प्रत्येक मराठी माणसाने नतमस्तक झाले पाहिजे. हीच ती पवित्र जागा आहे जिथे आपल्या तलवारीचे पाणी पाजून परकीयांची पळता भुईथोडी करणारे, मराठी साम्राज्याचा अशक्यप्राय विस्तार करणारे पुण्यप्रतापी बाजीराव पेशव्यांच्या अस्थी चिरनिद्रा घेत आहेत.