Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे जन्मस्थान – दुर्गाडी किल्ला

“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे असेल तर हिंदवी स्वराज्यासाठी स्वतंत्र आरमाराची बांधणी करणे हि काळाची गरज होती.

कल्याण शहर म्हणजे शिवपूर्व काळापासून एक प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते. शहराच्या संरक्षणार्थ चहुबाजूने तटबंदी, एकूण ११ बुरुज आणि अनेक लहान-मोठे दरवाजे बांधले होते. सन १६५४ साली शिवाजी महाराजांनी भिवंडी, कल्याण हि प्रमुख ठाणी जिंकून घेतली. कल्याण मधून वाहणारी उल्हास नदी थोडे अंतर पुढे जाऊन समुद्राला मिळते. ह्या उल्हास नदीच्या खाडीवर एका छोट्याशा टेकडीवर शिवाजी महाराजांनी किल्ल्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. हि सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून किल्ल्यास दुर्गाडी नाव दिले गेले. किल्ल्यामध्ये आरमाराची गोदी बांधून लढाऊ जहाजबांधणीचा कारखाना सुरु झाला. दुर्गाडी किल्ल्यामध्ये एकूण ३४० पोर्तुगीज कारागीर जहाज बांधणीच्या कामी असल्याची नोंद इतिहासात सापडते.

Durgadi Fprtदुर्गाडी किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई शहरापासून केवळ ४० किमी अंतरावर असलेले कल्याण शहर गाठावे. शहराच्या मध्यभागीच दुर्गाडी किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी दुर्गादेवीचे सुंदर मंदिर आहे. नव्याने उभारलेल्या कमानीतून प्रवेश करताच समोर एक छोटीशी गणपतीची मूर्ती दिसते. म्हणून ह्या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असेही म्हणतात. थोडी तटबंदी आणि बुरुजांचे बांधकाम पार करून देवीच्या मंदिराकडे जाता येते. उल्हास नदीकडील भागाकडे देखील किल्ल्याची थोडीशी तटबंदी आणि दोन बुरुजांचे बांधकाम दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८२ साली दुर्गाडी किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. हसन अली खान ह्या मोघल सरदाराने कल्याण प्रांत मोघलांना जिंकून दिला मात्र संभाजी महाराजांनी अल्पावधीतच हल्ला करून कल्याण प्रांत परत स्वराज्यात समाविष्ट केला. Durgadi Fortसंभाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८९ मध्ये कल्याण प्रांत परत मोघलांच्या ताब्यात गेला आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईमध्ये शामिल झाला. पेशवाईच्या काळात कल्याणचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी किल्ल्यातील दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १७२८ साली पोर्तुगीजांनी दुर्गाडी घेण्यासाठी किल्ल्यावर हल्ला केला मात्र किल्लेदार शंकरजी केशव आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला परतवून लावला.

आजमितीस किल्ल्याची आधुनिक पद्धतीने डागडुजी झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या Durgadu Fortदुगादेवीच्या दर्शनासाठी बरेच भाविक येत असतात. त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधलेले देवीचे मंदिर, रंगकाम केलेले किल्ल्याचे बुरुज-तटबंदी, किल्ल्याच्या अंतर्गत भागात बांधलेला सिमेंट-फरशी चा पादचारी मार्ग, बसण्यासाठी असलेले लोखण्डी बाक तसेच किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेली हार-फुलांची दुकाने ह्या सर्वांमुळे किल्ल्याला एका देवस्थानाचे स्वरूप आल्यासारखे वाटते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी तर अवश्य यावेच मात्र त्या सोबत दुर्गाडी किल्ल्याचे इतिहास महत्व देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. दुर्गादेवीच्या मंदिरासोबतच आपण अशा एका ऐतिहासिक स्मारकास भेट देतआहोत कि ज्याच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व परकीय सागरी शत्रूंना पुरून उरेल असे बलाढ्य आरमार उभारले होते याची आठवण देखील मनात असायला हवी.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *