Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

ताम्हण घाटाच्या वेशीवरील बलदंड पहारेकरी – घोसाळगड किल्ला

Ghosalgad Fortकोकणातील राजापुरीची खाडी म्हणजे व्यापाऱ्यांना सागरी मार्गे हिंदुस्थानात आपला माल उतरवण्यासाठी एक उत्तम जागा होती. राजपुरी-तळागड-घोसाळगड-ताम्हणघाट-घनगड ह्या पुरातन घाटमार्गाने हा माल विक्रीसाठी आणण्यात येत असे. ह्या घाट मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी ताम्हणघाटाच्या सुरवातीपाशीच घोसाळगड ह्या बलदंड दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती.

घोसाळगड किल्ला पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा शहर गाठावे. रोह्यापासुन राजापुरीला Ghosalgad Stepsजाणाऱ्या मार्गावर घोसाळे गाव वसले आहे आणि गावाच्या मागेच घोसाळगड किल्ल्याचा विस्तार दिसतो. घोसाळे गावातील देवीच्या मन्दिरापर्यत उत्तम गाडीमार्ग आहे. मन्दिरामागूनच किल्ल्याची पायवाट सुरु होते. ह्या सोप्या पायवाटेने थोडे उजवीकडे चालत गेल्यास सुमारे अर्ध्या तासामध्ये आपण किल्ल्याच्या तटबंदीखाली येतो. येथून दगडामध्ये कोरलेल्या काही पायर्याचढून किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो.

घोसालगडाचे प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळले असुन आजूबाजूच्या तटबंदी आणि बुरुजाचे बांधकाम Ghosalgad Sharabhकाही प्रमाणात शाबुत आहे. तटबंदीच्या जागी पडलेल्या दगडांमध्ये दोन शरभशिल्पे दिसतात. समोरच एक खडकात खोदलेले छोटे टाके आहे उजव्या बाजुला तटबंदीच्या खाली चोर दरवाजा देखील आहे. मात्र किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच चोर दरवाजा असण्याचे प्रयोजन मात्र समजत नाही. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला पायऱ्यांनी तटबंदीवर चढल्यावर एका बाजुला लांब सडक पसरलेली किल्ल्याची माची आणि एका बाजुला बालेकिल्ल्याचा भलामोठा विस्तार दिसतो. सर्वप्रथम तटबंदीवरुन चालत माचीकडे वळावे. माचीच्या टोकाला असलेल्या Ghosalgad Machiबुरुजाचे बांधकाम दुर्गस्थापत्याच्या दृष्टीने नक्कीच पाहण्यासारखे आहे. माचीच्या शेवटी मोकळी जागा फार कमी असल्यामुळे तटबंदीचे बांधकाम उजव्या बाजूस वळवुन बुरुजांची बांधणी केलेली दिसते. बुरुजाच्या मध्ये भगवा उभारला आहे. माचीवरून किल्ल्याच्या एका बाजूला असलेले घोसाळे गाव आणि एका बाजूला असलेल्या घनदाट अरण्याचे सुंदर दृश्य दिसते.

माचीचे मजबूत बांधकाम आणि सौन्दर्य पाहून परत भग्न प्रवेशद्वारापाशी यावे आणि बालेकिल्ल्याकडे Ghosalgad SHivpindवाट पकडावी. थोडीशी पायऱ्यांची चढण चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जायला पूर्ण डोंगराला वळसा मारून विरुद्ध दिशेने चढण करावी लागते. तत्पूर्वी डोंगराच्या कपारीमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला तीन-तीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम आहे ते जरूर पाहावे. यांपैकी डाव्या बाजूला असलेल्या टाक्यांच्या खडकावर व्यालशिल्प कोरलेले आढळते. उजव्या बाजूला असलेल्या टाक्यांच्या समूहामध्ये एक खांब टाके देखील आहे. ह्या उजव्या टाक्यांच्या थोडेसे वरून सुरु होणाऱ्या एका पायवाटेने Ghosalgad Waterबालेकिल्ल्याच्या पूर्ण डोंगराला वळसा मारता येतो. ह्या वाटेमध्ये काही खडकात खोदलेल्या गुहा आणि एक उघड्यावर असलेले शिवलिंग दिसते. बालेकिल्ल्याच्या विरुद्धबाजूस एका मोठी तोफ दिसते. ह्या तोफेच्या समोरूनच बालेकिल्ल्याची मुख्य चढण सुरु होते. बालेकिल्ल्याची हि चढण जरा निसरडी असल्याने जरा सांभाळून चढावी. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर फारसे अवशेष नाहीत. केवळ एक छोटासा बांधकामाच्या पायाचा चौथरा आढळतो. बालेकिल्ल्याची चढण परत सांभाळून उतरून आल्यामार्गाने परत प्रवेशद्वारापाशी यावे. येथे घोसाळगडाची गडफेरी पूर्ण होते.

Ghosalgad Cannonशिवपूर्वकाळामध्ये घोसाळगड किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. सन १६४८ साली रघुनाथपंत बल्लाळ कोरडे यांनी पाच हजाराचे सैन्य घेऊन घोसाळगड किल्ला स्वराज्यात शामिल केला आणि तसेच पुढे विजयी घोडदौड मारत राजापुरी पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. स्वराज्याची सीमा समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन भिडली. महाराजांनी घोसाळगाचे नाव वीरगड ठेवले होते. १६५९ साली जेव्हा अफजलखानाचे मोठे संकट स्वराज्यावर आले होते तेव्हा शिवाजी महाराजांच्या इतर शत्रूंना अशी स्वराज्य आता संपणार अशी खात्रीच झाली होती. तेव्हा जंजिऱ्याच्या सिद्दीने घोसाळगडास वेढा दिला होता. मात्र अफजलखान वधाची बातमी कळताच सिद्दी धसका घेऊन वेढा उठवून पळून गेला. पुढे १६६५ साली झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये जे बारा किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात राहिले त्यामध्ये घोसाळगड होता. १८१८ साली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुणे आणि मुंबई दोन्ही शहरांपासून घोसाळगडला एका दिवसाची दुर्गदर्शनाची मोहीम सहज शक्य आहे. घोसाळे गावामध्ये मंदिरात मुक्काम केल्यास तळागड आणि अवचितगड हे दोन किल्ले आणि जवळच असलेली कुडा लेणी दोन दिवसात सहज पाहता येईल. प्रत्येक दुर्गप्रेमीने भेट द्यावी असे हा एक उत्तम किल्ला आहे.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *