Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

किल्ले वज्रगड – जणू पुरंदरचा छोटा भाऊ

महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये अनेक जोड किल्लेही आढळतात. मावळात असलेले लोहगडविसापूर, बागलाण मध्ये असलेले मुल्हेरमोरगडहरगड, तसेच पुरंदर किल्ल्यालाहि एक जोडकिल्ला आहे त्याचे नाव वज्रगड. वज्रगडाची उंची पुरंदरपेक्षा तुलनेने कमी. त्यामुळे पुरंदरच्या सर्वोच्च टोकावरूनही  वज्रगडाचा विस्तार पाहता येतो. वज्रगडकिल्ल्यास रुद्रमाळ असेही म्हणतात.

पुरंदर किल्ल्याप्रमाणे वज्रगड किल्लाहि भारतीय सेनेच्या ताब्यात आहे. पुरंदरावर नागरिकांना प्रवेश असून किल्ल्याचा काही भाग पाहण्यासाठी खुला आहे. परन्तु वज्रगड किल्ल्यावर सामान्य नागरिकांना प्रवेश नाही. पुरंदरच्या प्रथम माचीवरून वज्रगड किल्ला थोडासा पाहता येतो. काही किल्ल्याच्या पुस्तकात असलेल्या माहिती प्रमाणे किल्ल्यावर तटबंदी, दरवाजा, पाण्याच्या टाक्या आणि एक हनुमानाचे मन्दिर आहे.

Vajragad Fort

इतिहासामध्ये वज्रगडचा उल्लेख येतो मिर्झा राजेंसोबत झालेल्या पुरंदरच्या लढाईमध्ये. मोघल बादशहा औरंगजेबने शिवाजी महाराजांविरुद्ध मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदारास धाडले होते. मिर्झा राजेंसोबत दिलेरखान नावाचा एक पठाणी योद्धा देखील होता. मोघली सेनेने पुरंदर ला वेढा दिला. युद्ध पेटलं. तोफा धडाडु लागल्या मात्र पुरंदर काही मोघलांना दाद देईना. अशावेळी दिलेरखानाने आधी बाजूचा वज्रगड जिंकण्याचे ठरवले जेणेकरून पुरंदर तोफेच्या टप्प्यात येईल. खानाने आपल्या माणसांकरवी, बैलांच्या साहाय्याने मोठ्या जिकरीने तोफा डोंगरावर चढवल्या. वज्रगडावर तीनशे मावळी फौज होती आणि दिलेरखान आपले हजारो सैन्य आणि बलदंड तोफखाना घेऊन धडाडत होता. पण मराठे खानास पुरून उरत होते. मराठ्यांनी रातोरात छापा घालून खानाच्या काही तोफा निकामी केल्या. पुरंदर सोडाच पण तुलनेने छोटा वज्रगड  घेणेही अवघड झाले होते.

पण एकेदिवशी दैव फिरले आणि खानाच्या तोफेने वज्रगडाच्या तटबंदीला खिंडार पडले. मोघलसेना गडामध्ये शिरुलागली. मराठ्यांनीहि जोरदार प्रतिहल्ला चढवला परन्तु अखेर माघार घ्यावी लागली. आणि वज्रगड मोघलांना मिळाला. पुरंदर तोफेच्या टप्प्यात आल्यामुळे पुढे तोही टिकवणं अवघड झालं आणि शिवाजी महाराजांना मिर्झा राजेंसोबत पुरंदरचा तह करावा लागला.

पण बलदंड पुरंदरचा लहान भावाप्रमाणे पाठीराखा असलेला हा वज्रगड किल्ला. भारतीय सेनेच्या ताब्यात असल्यामुळे गडावर जाणे शक्य नसले तरी आयुष्यात एकदातरी पुरंदर किल्ल्यावरून वज्रगड जरूर पहावा आणि त्या अन्यात तीनशे मराठी मावळ्यांना नमन करावे.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *