दुर्गभ्रमन्ती सोबत निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मधोमध स्थित असलेला कर्नाळा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. पनवेल शहराजवळ असलेल्या कर्नाळ्यास पूणे आणि मुंबई शहरापासून एका दिवसाची दुर्गदर्शनाची मोहीम सहज शक्य आहे. पुणे शहरापासून अंतर आहे सुमारे १२० किमी आणि मुंबई पासून सुमारे ५० किमी.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या प्रवेश कमानी पर्यत स्वतःच्या वाहनाने जाता येते तसेच पनवेल पासून सहा आसनी रिक्षा देखील उपलब्ध आहेत. कमानीपाशी अभयारण्याची प्रवेश फी आणि प्लास्टिक बाटल्यांची अमानत रक्कम द्यावी. समोरील डांबरी रस्त्याने काही अंतर चालल्यावर प्राण्यांचे पिंजरे दिसतात. अभयारण्यातील जखमी झालेले आणि सध्या औषधोपचार चालु असलेल्या पक्ष्यांना आणि इतर काही प्राण्यांना इथे ठेवले जाते. पिंजर्यांना वळसा मारून त्यांच्या मागूनच सुरु होते कर्नाळा किल्ल्याची चढण. किल्ल्यावर जाणारा डोंगराळ मार्ग चांगला प्रशस्त आहे आणि दुतर्फा अभयारण्याच्या झाडांची घनदाट सावली असल्यामुळे चढणीचा फारसा त्रास होत नाही. दगडधोंड्यांच्या आणि गर्द वनराईच्या मार्गाने सुमारे तासाभराच्या चढणीनन्तर आपण डोंगराच्या मुख्य सोंडेवर येऊन पोहोचतो. इथून उजव्या हाताला सुमारे अर्धातास चालल्यावर कर्नाळा गड दृष्टिक्षेपात येतो.
गडामध्ये प्रवेश करायला दोन प्रवेशद्वारे आहेत. विशेष म्हणजे हि दोन्ही द्वारे शिवकालीन गोमुखी पद्धतीने बांधलेली नाहीत. प्रथम दरवाज्याच्या पायऱ्यांची झीज झाल्यामुळे तिथे आधारासाठी लोखन्डी गज लावले आहेत. दरवाजाची कमान शाबूत आहे मात्र आजुबाजूच्या तटबंदी, बुरुजांची काहीशी पडझड झाली आहे. ह्या दरवाज्याच्या पायथ्याजवळच कर्णाई देवीचे छोटेसे मन्दिर आहे. मंदिरामध्ये पूर्ण काळ्या पाषाणमध्ये घडवलेली, सिंहावर आरुढ झालेली, हातात विविध शस्त्र धारण केलेली, सुमारे दोन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती दिसते. मंदिराबाहेर काही भग्न अवस्थेतील इतर मुर्त्या देखील आहेत. ह्या देवीच्या नावामुळेच किल्ल्याला कर्नाळा नाव पडले आहे. प्रथम दरवाजाच्या आत प्रवेश केल्यावर समोरच किल्ल्याचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो. ह्या दरवाज्याची नक्षीदार कमान आणि वरती बांधलेला बुलंद तट लक्षवेधक आहे. आत पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात आणि सुमारे १०–१५ पायऱ्या चढून गडामध्ये प्रवेश होतो.
कर्नाळा किल्ल्याचा विस्तार तसा फारसा मोठा नाही. दुसऱ्या दरवाज्याने गडामध्ये प्रवेश केल्यावर समोर पुरातन वाड्याच्या भिंती दिसतात. चहुबाजूने बांधलेली तटबंदी बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. तटबंदीमधे पहारेकर्यांसाठी टेहळणीला आणि तोफा ठेवण्यासाठी बांधलेले झरोके देखील काही ठिकाणी पहायला मिळतात. काही ठिकाणी दुहेरी तट बांधुन गडाला दुहेरी संरक्षण दिलेले देखील दिसते. माञ ह्या सर्वात जास्त लक्ष वेधून घेतो तो कर्नाळा गडाच्या मधोमध असलेला उंच, अजस्त्र, महाकाय, सरळसोट उभा असलेला पूर्णपणे गोलाकार डोंगरी टेम्भा.
सम्पूर्ण सह्याद्रीमंडळात असलेल्या अनेक गडकोटांपैकी कोणत्याही गडाच्या मधोमध असा महाप्रचंड सुळका दुसरीकडे कोठेच दिसणार नाही. ह्या सुळक्यावर चढण्यासाठी प्रस्तारोहणाचे साहित्य वापरूनच जावे लागते. मात्र ह्याच्या पायापाशी उभे राहून वर पाहताच त्याचा आकार आणि प्रचण्डपणा पाहूनच छाती दडपून जाते. दूरवरून पाहिल्यास ह्या सूळक्याचा आकार हा मानवी अंगढ्यासारखा दिसतो आणि त्यामुळेच पनवेल, माथेरान नजीकच्या अनेक डोंगररांगांवरून कर्नाळा किल्ला सहजगत्या ओळखता येतो. जर आकाशातून कधी कर्नाळा किल्ला पहिला तर मला वाटते कि ह्या सुळक्यामुळे किल्ल्याचा आकार शिवलिंगप्रमाणे दिसत असावा. सुळक्याच्या पायथ्याशी खडकात खोदलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या आणि साठवणुकीच्या खोल्या दिसतात. भर उन्हाळ्यात देखील ह्या टाक्यांमधील पाणी कधीही आटत नाही मात्र सद्यस्थितीत येथील पाणी पिण्यायोग्य नाही.
सुळक्याच्या डाव्या बाजूने काही अंतर चालल्यावर गडाचा तिसरा दरवाजा नजरेस येतो आणि त्या पुढे आहे एक प्रशस्त माची. माचीच्या संरक्षणासाठी हा तिसरा दरवाजा आणि आजूबाजूच्या बुरुजांची बांधणी केलेली आढळते. तिसऱ्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला शरभ आणि इतर शुभचिन्हे कोरलेली आढळतात. माची पाहून पुन्हा सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर गडफेरी पूर्ण होते. कर्नाळा वरून प्रबळगड, राजमाची हेकिल्ले आणि माथेरान डोंगररांग स्पष्ट नजरेस येते. कर्नाळा गडावरून आजूबाजूच्या अभयारण्यातील घनदाट अरण्याचे विहंगम दृश्य दिसते. गड चढताना आणि उतरताना जर शांतता राखली तर अनेक पक्ष्यांचा सुमधुर आवाजाचा आस्वाद घेता येईल. आजकाल अनेक हौशी ट्रेकर्स, कॉलेज मधील तरुण–तरुणी गडकिल्ले चढताना जोरात आरडाओरड करत, मोबाईलवर कर्कश गाणी वाजवत गडावर जात असतात. खरंतर असे न करता दुर्गभ्रमंतीच्या वेळी नेहमी शांतता अबाधित ठेवावी जेणेकरूण निसर्गातील अनेक सुमधुर आवाजांचा आनन्द लुटता येईल.
कर्नाळा किल्ल्याचा इतिहास पाहता, सुळक्याच्या पायथ्याला असलेल्या टाक्यांमुळे हा किल्ला सातवाहनकालीन असावा. निजामशाहीच्या अस्तानन्तर कोकण प्रांतासहीत कर्नाळा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. १६५७ साली शिवाजी महाराजांनी काढलेल्या कोकण मोहिमेमध्ये कर्नाळा किल्ला स्वराज्यात प्रथम शामील झाला. पुरंदरच्या तहामध्ये कर्नाळा किल्ला मोघलांना द्यावा लागला. नन्तर १६७० मध्ये मराठा सैन्याने छापा घालुन कर्नाळा परत स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यू नन्तर कर्नाळा पेशवाईच्या आधिपत्याखाली होता. असे सांगितले जाते कि, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवन्त फडकेंचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.
कर्नाळा किल्ल्यास भेट देण्यास कोणताही ऋतू उत्तम आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर येथे येणे कधीही चांगले मात्र भर उन्हाळ्यात जरी कर्नाळा किल्ल्यास भेट दिली तरी अभयारण्याच्या आल्हाददायक वातारणामुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. पुणे, मुंबई शहराच्या धकाधकीच्या दिनचर्येपासुन, पक्ष्यांचा मधुर गुंजारव ऐकत निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्यास आणि वन सौन्दर्याचा आस्वाद लुटण्यास कर्नाळा किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे.