होता जीवा म्हणून वाचला शिवा !
तसेच
होता खंडो म्हणून वाचला शंभो !
पहिल्या वाक्यासंबंधीची कथा तुम्हाला माहीत असेलच. अफजलखानाच्या भेटीनन्तर खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा दांडपट्टा घेऊन राजांवर चालून आला. तेव्हा राजांचा अंगरक्षक जिवा महाला सपकाळ याने प्रसंगावधान दाखवून सय्यद बंडाचा हातच छाटला आणि होणारा अनर्थ टळला.
मग आता वळूयात दुसऱ्या वाक्याकडे. छ्त्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये गोवा प्रांतामध्ये पोर्तुगिजांचा उच्छाद चालू होता. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणे, सक्तीचे धर्मांतरण असे अनेक प्रकार चालू होते. या सर्वांवर पायबंद बसवायला संभाजी महाराजांनी गोव्यामध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम आखली आणि जवळजवळ निम्मा गोमंतक प्रांत स्वराज्याला जोडला. गोव्यामध्ये समुद्रामधील जुवे बेटावरील पोर्तुगीजांचे एक महत्वाचे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात आले. अशावेळी पोर्तुगीज व्हॉईसरॉय कोंद अल्वोर खवळून उठला आणि आपल्या चारशे शिपायांसह त्याने जुवे बेटावर हल्ला चढवला.
पोर्तुगीज सैन्य टप्प्यात येताच मराठा सैन्याने गोफणीने दगडधोंड्याची बरसात सुरू केली. अचानक हल्ल्याने भेदरलेले पोर्तुगीज सैन्य मागे हटू लागले. मग मराठी सैन्याने निकराचा हल्ला चढवून पोर्तुगीजांना कापून काढायला सुरवात केली. ह्या गदारोळातून व्हॉईसरॉय कसाबसा सटकला आणि खाडीकडे पळ काढला. हे पाहताच व्हॉईसरॉयच्या घोड्याच्या मागावर खुद्द शंभुराजेच सुसाट निघाले मात्र एकटेच. खाडीच्या मध्ये पोर्तुगिजांची बोट होती. व्हॉईसरॉयने खाडीपाशी पायउतार होऊन बोटीकडे पोहत सुटला आणि त्यामागे शंभूराजांनी देखील धावत्या घोड्यासकट पाण्यात झेप घेतली. उसळत्या समुद्राच्या खाडीच्या पाण्यामध्ये महाराजांचा घोडा वाहतीकडे सरकू लागला.
महाराज घोड्याच्या रिकीबीतून पाय काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र समुद्राच्या उसळत्या पाण्यामध्ये महाराजांचा घोडा खोलात सरकत चालला होता. मराठा दौलतीचे छत्रपतीच समुद्राच्या वाहातीला लागले. तोच एक मराठी वीर जिवाच्या आकांताने सपासप हातपाय मारत पाण्यात झेपावताना दिसला. बघता बघता त्याने शंभुराजांना गाठले. महाराज समुद्राच्या उसळत्या लाटांशी झुंजत घोड्याच्या रिकीबीतून सोडवण्याचा यत्न करत होतेच. घोड्याच्या नाकातोंडी पाणी जात होते. अशावेळी एका हाताने महाराजांच्या घोड्याचा लगाम हाती धरून अंगाच्या बळावर पोहत पोहत त्या विराने घोड्यासकट महाराजांना सहीसलामत खाडीच्या काठाशी आणले.
तो पाणीदार वीर होता खंडोजी बल्लाळ !!
खंडोजीच्या प्रसंगावधनामुळे स्वराज्याचे छत्रपती सुखरूप राहिले. महाराजांनी खंडोजीला पालखीचा मान दिला. म्हणूनच म्हणतात. . .
“होता खंडो म्हणून वाचला शंभो”