Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

खरोसाची लेणी – एक सुंदर व दुर्मिळ शिल्परत्न

लातूर जिल्ह्यातील औसा किल्ला बघून आम्ही जेव्हा उदगीर किल्ल्याकडे मार्गस्थ झालो तेव्हा रस्त्यामध्ये मुद्दाम आवर्जून एका ठिकाणी थांबलो ते म्हणजे खरोसा लेणी बघायला. लातूर-निलंगा रस्त्यावरच लातूर पासून ४३ किमी व औसा पासून २३ किमीवर असलेल्या खरोसा गावानजीक एका छोट्या डोंगरांमध्ये खोदलेला एकूण १२ लहान-मोठ्या लेण्यांचा हा सुंदर व दुर्मिळ लेणी समूह. . .!

kharosa caves
खरोसा लेणी

महाराष्ट्रामध्ये बहुतकरून बौद्ध आणि जैन धर्मीय लेण्या विपुल आढळतात. मात्र खरोसा लेणी दुर्मिळ अशा हिंदू लेण्यांपैकी एक आहे. अजूनही खास विशेषता म्हणजे हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही पंथाशी निगडित शिल्पे इथे कोरलेली आढळतात. त्यामुळे इथे तुम्हाला कित्येक शिवपिंडी दिसतील, तसेच नागदेवता, शिवतांडव, रावणाचे कैलास पर्वत उचलणे, गणेशमूर्ती, समुद्रमंथन अशी शैवपंथीय शिल्पे आढळतील. तसेच राम-लक्ष्मण आणि रावणसेनेचे युद्ध, वराहवतार, बळी अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, विष्णुमूर्ती, श्रीकृष्णाने उचललेला गोवर्धन पर्वत अशी अनेक वैष्णवपंथीय शिल्पे देखील बघायला मिळतील. तसेच लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला द्वारपाल, नागशिल्पे, हत्तीशिल्प, एकाश्मी मंदिरे देखील कोरलेली आढळतात.

खरोसा लेणी दुर्मिळ असण्याचे अजून एक कारण म्हणजे येथील भौगोलिक रचना. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून काळ्या रंगाच्या मजबूत अशा बेसाल्ट खडकाच्या डोंगरांमध्ये लेण्या

Kharosa caves
गणपतीशिल्प

कोरलेल्या आढळतात. मात्र खरोसा लेणी कोरलेली आहे लालसर-जांभ्या रंगाच्या सच्छिद्र दगडांमध्ये. अशा प्रकारचा दगड बहुतकरून महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. मात्र कोकणापासून कित्येक शेकडो किलोमीटर दुर असलेल्या मराठवाडा प्रांतामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा गावामध्ये चक्क जांभ्या दगडाचा डोंगर आहे हे एक मोठ्ठे भौगोलिक आश्चर्य म्हणावे लागेल. अशा प्रकारचा खडक सच्छिद्र असल्यामुळे जास्त ठिसूळ असतो आणि लेणी कोरण्यासाठी निकृष्ट मनाला जातो. मात्र तरीही तब्ब्ल १२ लेण्यांचा समूह इथे घडवला गेला आणि आजही शेकडो वर्षांनंतरही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

खरोसा येथील एकूण १२ लेण्यांमध्ये आवर्जून बघावे असेल आहे सर्वप्रथम येणारे दुमजली लेणे आणि

kharosa caves
खरोसा लेणी – महादेव लेणी

महादेव लेणे. बाकी लेण्यांमध्ये बरेचसे लहान-मोठे विहार खोदलेले आहेत. दुमजली लेण्याच्या दोन्ही मजल्यांवर मोठाल्या खांबांवर तोललेला प्रशस्त सभामंडप कोरलेला दिसतो. वरील मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिना कोरलेला आहे. वरील मजल्यावर सभामंडपासोबतच गाभारा कोरलेला असून आत एक शिवपिंड कोरलेली आहे. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक छोटी खोली कोरलेली आहे ज्या मध्ये दोन सुंदर गणेशमूर्त्या कोरलेल्या आहेत.

महादेव लेणे हे एकूण १२ लेण्यांपैकी तिसरे लेणे असून विस्ताराने सर्वात मोठे आहे. लेणी मध्ये पवेश करताच समोर गाभारा, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील नागशिल्पे, द्वारपाल आणि गाभाऱ्यामधील

mahadev cave
महादेव लेणीतील शिवपिंड

शिवपिंड दिसते. गाभाऱ्याच्या बाजूने प्रशस्त असा प्रदक्षिणा मार्ग देखील कोरलेला आढळतो. महादेव लेण्याच्या डाव्या बाजूस सर्व शैवपंथीय शिल्पे व उजव्या बाजूला सर्व वैष्णवपंथीय शिल्पे कोरलेली आढळतात. यांपैकी रावणानुग्रहाचे शिल्प तसेच वराह अवताराचे शिल्प खूपच सुंदर आहे. आपल्या दोन हातामध्ये तलवार धरून उरलेल्या एकूण अठरा हाताने रावणाने कैलास पर्वत उचलेला आहे. वरील बाजूस बसलेले शिव-पार्वतीचे शिल्प दिसते. रावणाचे सर्व हात, हाताची बोटे, अंगावरील अलंकार हे सर्व अगदी सुंदररीतीने बारकाईने कोरलेले आहे. श्रीविष्णूच्या वराह अवताराच्या शिल्पामध्ये वराहाच्या बाहुवर विराजमान झालेली पृथ्वीदेवीचं दर्शवली आहे. तसेच नरसिंह अवतार, समुद्रमंथन, राम-लक्ष्मण व रावनसेनेचे युद्ध, शिवतांडवनृत्य अशी अनेक सुंदर शिल्पे महादेव लेण्यामध्ये कोरलेली आढळतात.

खरोसा लेणीची भेट हि खरंच आपल्याला आनंदाचा सुखद अनुभव देऊन जाते. येथील हिंदू देवदेवतांची सुंदर शिल्पे पाहून शेकडो वर्षांपूर्वी राबलेल्या त्या अन्यात शिल्पकारांना नमन करावेसे वाटते. मराठवाड्याचा लातूर जिल्हा जिथं उंचच्या उंच डोंगर नाहीत. बहुतकरून सपाट भूभाग असलेल्या ह्या प्रदेशामध्ये असे सुंदर, दुर्मिळ शिल्परत्न असेल अशी कल्पनाच करवत नाही. खरोसा लेणीला केवळ इतिहासिक व धार्मिक नव्हे तर भौगिलिक महत्व देखील आहे. त्यामुळे अशी दुर्मिळ, लाल-जांभ्या दगडातील आणि शैव-वैष्णव पंथाचा सुरेख मिलाप असलेली खरोसा लेणी प्रत्येकाने आवर्जून बघावी.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *