सुमारे चौदा-पंधराव्या शतकामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच ह्या परकीय व्यापाऱ्यांनी सागरी मार्गाने व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात पाय ठेवले आणि नन्तर हळुहळु व्यापारासोबत साम्राज्यविस्तारही करु लागले. ह्या परकीय शत्रूंनी आपल्या संरक्षणासाठी काही किल्ल्यांची उभारणी केली. त्यापैकी एक आहे पोर्तुगीजांनी उभारलेला रायगड जिल्ह्यातील कोर्लाई किल्ला.
अलिबाग पासुन सुमारे २५ किमी अंतरावर कोर्लाई गावाच्या मागे समुद्रकिनाऱ्याजवळ एका छोट्या टेकडीवर कोर्लाई किल्ला बांधलेला आहे. अलिबागनन्तर असलेले चौल, रेवदंडा हि गावे सोडून पुढे असलेल्या कुंडलिका नदीवरील पुल ओलांडल्यावर ६ किमी वर कोर्लाई गाव वसलेले आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्रास मिळते तिथे नदीच्या खाडीवर सागरी व्यापारमार्गाच्या मोक्याच्या जागी कोलाई किल्ल्याची उभारणी केलेली दिसते. म्हणूनच किल्ल्याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी “कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे” असे म्हणून गौरवले आहे.
पंधराव्या शतकामध्ये हा प्रदेश निजामशाहीच्या ताब्यात होता. तेव्हा पोर्तुगीजांनी कोर्लाई गावाजवळील टेकडीच्या पायथ्याशी व्यापारी बोटींसाठी धक्का बांधायची परवानगी मागितली. शतकाच्या उत्तरार्धात निजामशाहीमध्ये झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेऊन पोर्तुगीज टेकडीवर तटबंदी बांधू लागले. हुसेन निजाम ह्या निजाम बादशहाला हे कळताच त्याने पोर्तुगीजांचे हे बांधकाम बंद केले आणि कोर्लाईच्या टेकडीवर स्वतःच एक किल्ला उभारला. मात्र सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी ह्या निजामाच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला आणि सर्व किल्ला पाडून पोर्तुगीज पद्धतीने किल्लाचे पुनर्निर्माण केले. पोर्तुगीजांच्या काळामध्ये किल्ल्यावर एकूण ७० तोफा आणि सुमारे ८००० सैन्य असल्याचा उल्लेख आढळतो. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. पुढे १७३९ साली बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ, चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध काढलेल्या कोकण मोहिमेमध्ये सुभानराव मानकर यांना कोर्लाईवर पाठवले आणि वर्षभरात किल्ला हाती आला. किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर किल्ल्यावरील बुरुजांची पोर्तुगाल नावे बदलून मराठी नावे ठेवण्यात आली. सान्त दियागोचे नाव पुस्ती बुरुज व सान्त फ्रान्सिस्कोचे नाव गणेश बुरुज ठेवण्यात आले.
कोर्लाई गावाच्या मागे समुद्रकिनाऱ्याच्या बाजुला एक दीपगृह उभारलेले दिसते. ह्या दिपगृहाच्या बाजूनेच किल्ल्यावर जायला उत्तम पायऱ्यांचा मार्ग आहे. टेकडीची उंची जास्त नसल्याने सुमारे १०-१५ मिनिटात किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. एका लांब टेकडीवर बांधलेल्या ह्या किल्ल्यामध्ये तटबंदी आणि बुरुजांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून अनेक छोटे छोटे विभाग पडलेले आहेत. प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला काही अंतर चालत गेल्यावर समुद्र किनाऱ्याजवळ असलेली किल्ल्याची माची नजरेस येते. कोर्लाई किल्ल्याच्या दोन बाजुस समुद्र एका बाजुस कुंडलिका नदीच्या खाडीचा जलाशय असल्यामुळे ह्या माचीवरून भोवतालच्या सिंधुसागराचे विहंगम दृश्य दिसते. माचीवर डाव्याबाजूस समुद्रकिनार्याकडे असलेला किल्ल्याचा दरवाजा दिसतो.
किल्ल्याची हि प्रशस्त माची आणि सभोवतालच्या समुद्राचे सौन्दर्य डोळ्यात साठवुन परत मागे बालेकिल्ल्याची वाट पकडावी. ह्या वाटेवर डाव्या बाजुला एकाठिकाणी एक तोफ दिसते. गडाच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोर एक छोटेसे शन्कराचे, रत्नेश्वराचे मन्दिर दिसते. मंदिरासमोर एक छोटेसे तुळशी वृंदावन असुन मंदिराच्या कडेने छोटासा ओटा बांधलेला दिसतो. मंदिराच्या जवळच एक भूमिगत असलेले पाण्याचे टाके दिसते. येथील पाणी पिण्यायोग्य आहे.बालेकिल्ल्याच्या चारही बाजूस चार बलदंड बुरुज उभारलेले दिसतात. बुरुजांवर चढायला पायऱ्यांची रचना केलेली दिसते. बालेकिल्ल्यावरील ह्या बुरुजांवर एकुण ७ तोफा दिसतात.
बालेकिल्ला ओलांडून पुढे गेल्यावर चर्चचे बांधकाम दिसते. ज्या कमानीमधून बालेकिल्ल्यातून चर्चपाशी प्रवेश करतो कमानीवर पोर्तुगाल भाषेतील एक शिलालेख आणि पोर्तुगीजांचे युद्धचिन्ह कोरलेले दिसते. कोर्लाई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना सुमारे सोळाव्या शतकात चर्चचे बांधकाम झाले असावे मात्र आजही हे बांधकाम बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. प्रवेशदवारावरील नक्षीकाम, आतील छोटेसे सभागृह, सभागृहातील पायऱ्यांची रचना, भिंतींमध्ये केलेले कोनाडे, छतावरचे नक्षीकाम पाहून जुन्या काळातील ह्या चर्चच्या सौन्दर्याची कल्पना येते. चर्चच्या आजूबाजूला काही बांधकामांच्या पायांचे जोते आणि भिंती दिसतात. चर्चच्या उजव्या बाजूला थोडे खाली पायऱ्या उतरून गेल्यास किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वाराच्या थोडे आधी जमिनीवर तटबंदीला टेकवून ठेवलेला पोर्तुगाल भाषेतील एक शिलालेख आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर देखील पोर्तुगीजांचे युद्धचिन्ह कोरले आहे. प्रवेशद्वार पाहून परत चर्च पाशी येऊन चर्चच्या मागे थोडे अंतर चालत गेल्यावर कोर्लाई किल्ल्याची गडफेरी पूर्ण होते. चर्चच्या मागील बाजूस तटबंदी व बुरुजांचे अवशेष दिसतात.
कोर्लाई किल्ला पाहताच नकळतपणे पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या दुर्ग बांधणीच्या पद्धतीमध्ये तुलना करावीशी वाटते. कोर्लई गडावर गोमुखी पद्धतीचे, वळणदार आणि बुरुजांमध्ये लपवलेले गडाचे मुख्य प्रवेशद्वार आढळत नाही. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या दिसत नाहीत. गडावरील अनेक दरवाजांवर, बुरुजांवर गणपती, हनुमान इत्यादी देवता किंवा कमळ, मोर, हत्ती, व्यालशिल्प, शरभ ह्यांचे कोरीवकाम येथे दिसत नाही. कोर्लाई गडावर बंदिस्त असा भूमिगत जलसाठा असून मराठ्यांच्या दुर्गबांधणीमध्ये पाण्याचे टाके हे खडकामध्ये सपाटीवर किंवा डोंगराच्या कपारीत खोदले जाते. अर्धगोलाकार बुरुजांएवजी येथे कोनांमध्ये बांधलेले, षट्कोनी, पंचकोनी आकाराचे बुरुज दिसतात. परंतु तरीही इतरांपेक्षा निराळा असलेला हा पोर्तुगीज धाटणीचा सुंदर कोर्लाई किल्ला सहजच आपल्याला त्याच्या सौन्दर्यात रममाण होण्यास भाग पडतो.