जावळीच्या अरण्यातील टेहळणीसाठी उभारलेला एक अप्रतिम सुंदर वनदुर्ग म्हणजे मधुमकरंदगड. जावळीचे खोरे आणि इथे असलेल्या अनेक घाटवाटांवर देखरेखी साठी ह्या गडाची निर्मिती केली असावी असा कयास निघतो. जावळीच्या अरण्यातील बलदंड प्रतापगडापेक्षा मधूमकरदंगडाची उंची काहीशी जास्त असल्यामुळे हा टेहळणीसाठी एक उत्तम किल्ला होता. गडावरून प्रतापगडाचे अगदी सुस्पष्ट दर्शन होते. तसेच तळकोकणाचा भूभाग आणि आकाश निरभ्र असल्यास राजगड, तोरणा हे किल्लेही नजरेस येतात. असा हा आडवाटेवरचा पहारेकरी मधूमकरदंगड एकदातरी जरूर पहावा.
प्रतापगडापासून हा गड अगदी जवळ असला तरी येथे प्रतापगडाप्रमाणे वरपर्यंत गाडीरस्ता नाही. महाबळेश्वर पासून प्रतापगडाला जाणार रस्ता पकडावा मात्र प्रतापगडाकडे वळण न घेता चतुर्बेट, गोरोशी गावाकडील रस्ता पकडावा. चतुर्बेट गाव पार केल्यांनतर थोड्या अंतरावर उजव्या हातला घोणसपुर गावाचा बोर्ड आणि एक कच्चा रस्ता दिसतो. हेच घोणसपुर गाव आहे मधु मकरंदगडाच्या पायथ्याचे गाव. घोणसपुर बोर्डपासून गावापर्यंत कच्चा आणि उभ्या चढणीचा रस्ता असल्यामुळे मजबूत चारचाकी वाहन असल्यास पुढे मार्गस्थ व्हावे. अन्यथा बोर्डजवळ गाडी लावून सुमारे तासाभराची पायपीट करून घोणसपुर गाव गाठावे. घोणसपुर गावातील लोकवस्तीमध्ये घरगुती मुक्कामाची व जेवणाची सोय होऊ शकते.
घोणसपुर गावातून गडमाथा अगदी स्पष्ट दिसून येतो आणि इथून गडावर जायला अजुन साधारण एक तास लागतो. गडाची मुख्य चढण जेथून सुरु होते तेथे एक मोठे शिवमंदिर असून येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते. मंदिरापासून सुमारे १५-२० मिनिटांच्या चढणीनंन्तर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जागा येते. गडाचे प्रवेशद्वार सध्या पूर्णपणे नामशेष झाले आहे. मात्र प्रवेशाच्या पायऱ्या, तटबंदीचे अवशेष आढळतात. गडाची चढण साधारण निम्मी चढल्यावर एक भैरवाची मूर्ती दिसते आणि येथे रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवा रस्ता थेट गडमाथ्याकडे आणि डावा रस्ता एका पाण्याच्या टाक्याकडे घेऊन जातो. आपण साधारण तासाभरात गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो. येथे एक छोटेसे शंभूमहादेवाचे, श्रीमल्लिकार्जुन मन्दिर आहे. मंदिरासमोर एक समाधी सदृश्य स्मारक आहे.
गडमाथा तसा छोटा आहे पण इथून जावळी अरण्याचा आणि कोकणचा बराच भुभाग दिसून येतो. प्रतापगड, राजगड, तोरणा हे किल्लेही दृष्टीस येतात. मधु मकरंदाचे भौगोलिक महत्व येथे समजून येते कि किल्ल्याचा टेहळणी साठी कसा उपयोग होत असावा. गडमाथ्यावरुन एक पायवाट खाली उतरत आपल्याला एका खांबटाक्यांपाशी घेऊन जाते. हे टाकं पांडवांनी खोदले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. ह्या पाण्याच्या टाक्यांच्या एका खांबावर मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते.
गड चढायला अतीशय सोपा असून विशेष करून आजूबाजूचे जावळीचे अरण्य गडावरून बघायला फार नयनरम्य आहे.
पावसाळ्यामध्ये ह्या भागात प्रचंड मुसळधार पाऊस बरसत असतो. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येथे येणे जास्त सोयीचे. विशेष करून मे महिन्याचे शेवटचे पंधरा दिवस. तेव्हा येथे प्रचंड संख्येने कावजे बघायला मिळतील. मुद्दाम येथे घोणसपुरला रात्री मुक्काम करावा आणि मध्यरात्री उंचावरून खाली असलेल्या अरण्यात पहावे. खाली अंधारात खाली आपल्या नजरेसमोर चांदण्या लुकलुकल्याचा भास व्हावा इतक्या मोठ्या संख्येने येथे रात्रीच्या अंधारात काजवे चमकतात. घोणसपुर गावाच्या एखाद्या घराच्या अंगणात पाच मिनटे स्तब्ध बसल्यास कित्येक काजवे तुमच्या अंगाखांद्यावर येऊन बसतील. हा अवर्णनीय आनंद आपल्याला शहरी जीवनामध्ये अनुभवायला मिळणे केवळ अशक्यच. जावळीचे अरण्य आणि काजव्यांची जादू पहायला ह्या आडवाटेवरील पहारेकरी असलेल्या प्रतापगडाच्या ह्या पाठिराख्याला, मधुमकरदंगडला एकदा तरी नक्की भेट द्यावी.