आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काना-कोपऱ्यात भटकंती करताना आजही अशी अनेक गावे, अनेक ठिकाणे सापडतील जी आधुनिकीकरणाच्या युगातही आपले आपले प्राचीनत्व टिकवून आहेत. असेच एक छोटेखानी गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील, माळशिरस तालुक्यातील – नातेपुते. पुणे-पंढरपूर महामार्गावरील फलटण शहरापासून सुमारे ४० किमीवर नातेपुते वसले आहे. सातारा शहरापासून जायचे असल्यास शिखर शिंगणापूर ओलांडून पुढे केवळ १५ किमीवर प्रवास करून नातेपुते गाठता येते.
नातेपुते गावाचा इतिहास पाहता ह्या गावाचे पुरातन नाव नर्तकीपुर होते असे आढळते. नन्तरच्या काळामध्ये ह्याचे अपभ्रंश होऊन नातेपुते नाव अडले असावे. आधीच्या काळी संपूर्ण गाव तटबंदी-बुरुजाच्या भरभक्कम संरक्षणामध्ये वसलं होत. तटबंदीच्या परकोटाची आतमध्ये एक मुख्य कोट होता जिथे पंचक्रोशीच्या सर्व कारभाराची मुख्य कचेरी होती. आजमितीस नातेपुते गावात फेरफटका मारताना ह्या मुख्य कोटाचा केवळ एकमेव बुरुज पाहायला मिळतो. मात्र गावामध्ये भटकताना अनेक ठिकाणी पुरातन दगडी बांधकामाच्या भिंती, पुरातन जलसाठे, घरांच्या पायाचे जोते आढळतात. मात्र नातेपुते गावाचे खरे प्राचीनत्व सिद्ध करतात येथील दोन हेमाडपंथी शैलीतील मंदिरे. महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडात सुमारे तेराव्या शतकात, यादव साम्राज्याच्या काळामध्ये हेमाडपंथी वास्तुशैलीचा उगम झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हेमाडपंथी वास्तुशैलीतील मंदिरे आढळतात निश्चितच ती ठिकाणे फार पुरातन म्हणता येतील. नातेपुते गावामध्ये अशीच दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत, गिरिजापती मंदिर आणि बळीचे मंदिर. तसेच ह्या मंदिराच्या जोडीने गावामध्ये अनेक वीरगळी देखील आढळून येतात. हि सर्व प्रमाणे सिद्ध करतात कि एकेकाळी नातेपुते हि वीरांची भूमी देखील होती.
नातेपुते पासून सुमारे १५ किमीवर असलेले शिखर शिंगणापूर मंदिर तर सर्वन्यात आहेच. कारण हे आहे शिव-पार्वतीचे विवाहस्थळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत. मात्र फार कमी लोकांना हे माहित असेल कि नातेपुते हे पार्वतीचे माहेर आहे. शिव-पार्वतीच्या मिलनाची कथा आजही आपल्या येथील स्थानिक लोकसाहित्याच्या ओव्यांमधून ऐकायला मिळते
आल्याड नातंपुतं, पल्याड शिंगणापूर |
दवण्यासाठी गेला, भोळा शंकर दूर ||
वाजत्याती वाजांतरी, नात्यापुत्याच्या लवनी |
भोळ्या शंभू महादेवाचं गेलं लगीन लागुनी ||
दवणा नावाची एक सुंगंधी व औषधी वनस्पती ह्या भागात आढळते. वरील ओव्यांनुसार, ह्याच दवणा वनस्पतीच्या शोधार्थ शिवशंकर कैलासावरून नातेपुते परिसरामध्ये आले आणि इथे त्यांना देवी पार्वती दिसली. नन्तर ह्या दोघांचे शिखर शिंगणापूरला लग्न लावण्यात आले. पार्वतीचे माहेरचे नाव होते गिरीजा, म्हणून नातेपुते गावामध्ये असलेल्या शिवमंदिराला गिरिजापती मंदिर म्हणतात. तसेच पार्वतीचा भाऊ बळियाप्पा याचे मंदिर देखील गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे. हि दोन्ही मंदिरे पुरातन हेमाडपंथी शैलीतील आहेत.
गिरिजापती मंदिर तुलनेने जास्त मोठे प्रशस्त असून मंदिराला चहुबाजूने भक्कम तटबंदी आहे. मंदिराला तीन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. मंदिर प्रांगणात प्रवेश करताच तीन उंच दीपमाळा आपले स्वागत करतात. भरभक्कम दगडी खांब असलेला सभामंड्प, सभामंडपामध्ये विराजमान असलेला नन्दी आणि मुख्य देव-गाभारा अशी मंदिराची बांधणी आहे. मंदिरच्या शिखराची नव्याने बांधणीकेली असून सुंदर रंगकाम केले आढळते. मंदिराच्या आसपास काही पुरातन मुर्त्या देखील ठेवल्या आहेत. त्यामध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेली शिवमूर्ती म्हणजे गौरीहराची मूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि दुर्मिळ अशी चतुरलिंगी शिवपिंड अवश्य बघावी.
मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यावर एक शिलालेख कोरलेला आढळतो. त्या शिलालेखामध्ये शके १७८४ च्या श्रावण महिन्याचा उल्लेख आहे. ह्या काळामध्ये मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम झाले असावे. मुख्य गाभाऱ्यामध्ये चौकोनी शिवपिंडीवर शिवलिंगाऐवजी दोन शाळुंका आहेत ज्या शिव-पार्वतीचे स्थान दर्शवतात. मंदिराच्या बाहेर अनेक वीरगळी भग्नावस्थेत पडलेल्या आहेत, तसेच एक सतीशिळा देखील आढळते. स्थानिक लोकांनी ह्या वीरगळींचे आणि सतीशीळेचे योग्य जतन करून मंदिर आवारात ठेवायला हवे.
गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे पार्वतीचा भाऊ बळियाप्पा म्हणजेच बळी मंदिर. हे मंदिर तुलनेने छोटे असून मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रथम शनी व हनुमानाची मूर्तीचे दर्शन होते. इथेही छोटेखानी सभामंड्प आणि गाभारा अशी रचना आढळते.
बळी मंदिराच्या बाहेरही दोन वीरगळी अर्ध्या जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. ह्या दोन हेमाडपंथी पुरातन मन्दिराखेरीज नातेपुते गावातील आवर्जून बघावे असे अजून एक मंदिर म्हणजे पर्वतेश्वर मंदिर. एका छोट्या टेकाडावर बांधलेले हे शिवमंदिर सुमारे शंभर वर्षापूर्वीचे असावे. मंदिरापर्यंत जायला उत्तम पायरीमार्ग आहे. कमानींमधून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पुरातन देवड्या दिसतात आणि दोन उंच दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा सभामंड्प लाकडी खांबांवर बांधलेला असून गाभाऱ्यामध्ये शाळुंका असलेली शिवपिंड आहे.
पर्वतेश्वर मंदिराच्या आवारामध्ये दोन सुंदर सुस्थितीतील वीरगळी आहेत. त्यापैकी एक आहे द्वंद्वयुद्ध वीरगळ आणि एक आहे गोधन रक्षण वीरगळ. तसेच स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते कि पर्वतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने एक भुयारी मार्ग होता जो थेट शिखर शिंगणापूर मंदिराकडे जात असे. मात्र सध्या हा भूयारी मार्ग बुजवलेला आढळतो.
हाताशी पुरेसा वेळ असेल नातेपुते पासून साधारण ४० किमीवर अंतरावर असलेल्या वेळापूर गावातील अर्धनारी नटेश्वरह्या पुरातन शिवमंदिराला देखील भेट देता येईल. तसेच जर दोन-तीन दिवसांचे उत्तम नियोजन केले आणि स्वतःचे वाहन असेल तर नातेपुतेच्या जवळपास आपल्याला अनेक किल्ल्यांची भटकंती देखील करता येईल. सातारा जिल्ह्यातील संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले नातेपुते पासून पहाटे लवकर निघून एका दिवसात बघता येऊ शकतात. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव आणि अकलूज येथील सुंदर भुईकोट किल्लेहि पाहता येथील. यापैकी अकलूजच्या किल्ल्यामध्ये उभारलेली शिवसृष्टी तर प्रत्येक इतिहासप्रेमीने अवश्य पाहावी.
पुणे-सातारा शहरापासून जर तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार अशी एक दिवसीय छोटी, शांत, निवांत अशी सहल आयोजित करायची असेल तर नातेपुते आणि परिसर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एखाद्या आधीच प्रसिद्ध असलेल्या गजबजलेल्या, गर्दीच्या ठिकाणी सहलीला जाण्याऐवजी कधीतरी वाकडी वाट करून अशा आडवाटेवरील कमी विख्यात जागेला देखील भेट द्यावी. खास करून दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी व्यक्तींनी तसेच ज्यांना पुरातन मंदिरे, वीरगळी, स्मारके बघायची आवड असेल त्यांना तर नातेपुते परिसरातील मंदिरे आणि किल्ले म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरेल.