Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

पद्मदुर्ग – जंजिरेकर सिद्दीच्या नाकावर टिच्चून बांधलेला सुंदर जलदुर्ग

Padmadurgaमुरुडराजापुरी कोकण किनारपट्टीवरील जंजिरा किल्ला म्हणजे स्वराज्याला जडलेले एक मोठे दुखणे झाले होते. जंजिरा किल्यामध्ये राज्य करत होते अत्यन्त क्रूर, निर्दयी, धर्मांध असे सिद्दी सत्ताधीश. कोकणकिनारपट्टी वरील हिंदू जनता सिद्दीयांच्या जाचाने फार त्रासली होती. ह्या स्वराज्याला लागलेल्या वाळवीचा समुळ नायनाट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक वेळा जंजिऱ्याची मोहीम काढली मात्र काही केल्या जंजिरा ताब्यात येईना. अखेर सिद्दयाला काटशह देण्यासाठी महाराजांनी जंजिऱ्याजवळ स्वतःचा जलदुर्ग उभारायचे ठरवले आणि महाराजांनी हेरले जंजिऱ्याच्या उत्तरेस असलेले कांसा बेट.

कांसा बेटावर स्वराज्याच्या जलदुर्गाचे बांधकाम सुरु झाले. पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार अशा कित्येक कारागिरांची रवानगी करण्यात आली. जिवाजी विनायक यांच्याकडे बांधकामाला लागणाऱ्या सर्व रसदीच्या पुरवठ्याची जवाबदारी सोपवली होती. हि बातमी समजताच सिद्दीने चवताळून बेटावर हल्ला चढवला. मात्र शिवाजी महाराजांनी सिद्दयांचा हल्ल्याला रोखण्यासाठी दौलतखान ह्या स्वराज्याच्या आरमार प्रमुखाला सज्ज ठेवले होते. अखेर दिवसरात्र एक करून, सिद्दयांचा नाकावर टिच्चून मराठ्यांनी कांसा बेटावर जलदुर्ग उभारला. दुर्गाचे नामकरण झाले पद्मदुर्ग.

Padmadurga Entrance

पद्मदुर्ग किल्ल्याचे बांधकाम सुरु असताना जिवाजी विनायक यांच्या कडुन बांधकामाला आवश्यक साहित्य रसद पुरवण्यात काहीशी हयगय घडली. हि बातमी शिवाजी महाराजांना समजताच अतिशय जहाल खरमरीत भाषेमध्ये पत्र लिहून महाराजांनी जिवाजी विनायक यांची कानउघडणी केली होती. हे शिवकालीन पत्र आजही उपलब्ध आहे. पद्मदूर्ग किल्ल्यामुळे सिद्दयांचा नाविक कारवायांना पायबंद तर बसलाच शिवाय सिद्दयांचा मनात मराठ्यांबद्दल जबर दहशत निर्माण झाली. संभाजी महाराजांच्या मृत्यू नन्तरही पद्मदूर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता.

आजमितिस पद्मदूर्ग किल्ल्यास भेट देणे काहीसे अवघड आहे. मुरुड समुद्रकिनार्यावरून जंजिऱ्यावर जायला बोटी सहज उपलब्ध आहेत मात्र पद्मदुर्गावर जायला नाविक सहसा तयार होत नाहीत. पद्मदुर्गला बोट उतरवण्यासाठी धक्का नाही आणि कोणी नाविक तयारही झाल्यास बोटीचे भाडे अतिशय महाग सांगतात. पुणेमुंबई मध्ये दुर्गमोहिम आयोजित करणाऱ्या अनेक संस्था आहेत. अशा एखाद्या संस्थेने मोहित आयोजित केल्यास त्यामार्फत पद्मदुर्गाला जाणे जास्त सोयीस्कर ठरेल.

मुरुड किनाऱ्यावरून किल्ल्याकडे जातानाच किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग का ठेवले याचे उत्तर मिळते. किल्ल्याच्या तटबंदीवर केलेले कमळ पुष्पाच्या पाकळ्यांसारखी सुंदर नक्षीकाम दुरूनच नजरेस येते. किल्ल्याच्या पडकोटाच्या एका बुरुजावर केलेली पाकळ्यांची रचना पाहून सुंदर कमलपुष्प उमलले असावे असा भास होतो. बेटावर उतरल्यावर दोन बुरुजांच्या मध्ये असलेले किल्ल्याचे बुलंद प्रवेशद्वार नजरेस येते. किल्ल्यात प्रवेश करताच अनेक दुर्गावशेषांचा खजिनाच समोर खुला होतो. किल्ल्याच्या चौफेर सुस्थितीत असलेली तटबंदी, पहारेकऱ्यांच्या देवड्या, तटबंदी खालील दारुकोठारे, पाण्याचे दोन तलाव, अनेक प्रशस्त बुरुज, बुरुजावर जाण्यासाठी बांधलेले जिने, बुरुजावरील खोलीचे बांधकाम, तटावर पहाऱ्यासाठी बांधलेली फांजी, तोफांच्या अनेक जंग्या, तोफा तटावर चढवण्यासाठी केलेली पुलीची व्यवस्था, किल्ल्याचे दुसरे बुलंद प्रवेशद्वार आणि आजही किल्ल्यामध्ये असलेल्या तब्बल ४०४५ तोफा.

तटबंदीवर पहारा करताना पहारेकरी सैनिक नैसर्गिक विधीसाठी लांब जाऊ नये या साठी तटबंदी मध्ये जागोजागी बांधलेली शौचकूपे देखील पद्मदुर्गावर पाहायला मिळतात. अशी व्यवस्था सध्या फारच तुरळक शिवकालीन किल्ल्यांमध्ये पाहायला मिळते.

पद्मदुर्ग किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि मराठ्यांच्या झुंजार वृत्तीचे एक उत्तम उदाहरण. मात्तबर शत्रु अगदी जवळ असतानाही एकीकडे शत्रुशी झुंजत बळकट जलदुर्ग उभारणे म्हणजे खरेच फार जिकरीचे काम. मात्र खेदाची बाब म्हणजे जेवढे पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी जातात तेवढे पद्मदुर्गाकडे वळत नाहीत. स्वतः शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाचे वर्णन केले आहे कि, “पद्मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे.” असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *