पुणे शहर ज्यांना माहित आहे ते जाणून असतील कि पुणे शहरात रोजचे वातावरण कसे असते असते. रस्यावरील वाहने, माणसांची गर्दी, हॉर्न चा कर्कश आवाज, ध्वनीप्रदूषण ह्या येथील नेहमीच्या समस्या. ह्या सर्व गदारोळापासून जरा निवांत क्षण घालवायला पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक लेणी आहे हे एखाद्या नवख्या व्यक्तीला खरेहि वाटणार नाही.
मलाही खरे वाटले नव्हते जेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले कि जन्गली महाराज रोडवर एक लेणी आहे. मला वाटले होते पुण्याच्या आसपास बाणेर, पाषाण येथे जो काही थोडासा डोंगराळ भूभाग आहे इथे लेणी असेल. जन्गली महाराज रोड हा पुणे शहराचा एक मध्यवर्ती इलाखा. इथे नेहमी वाहनांची गर्दी असते पण इथे लेणी असेल असे मलाही वाटले नव्हते. मी माझा मित्र चैतन्यला ह्या बद्दल विचारले आणि आम्ही दोघांनी पाताळेश्वर लेणीला भेट द्यायचं ठरवलं.
जन्गली महाराज रस्ता जेथून सुरु होतो तेथे पाषाणकर नावाचे दुचाकीचे शोरूम आहे. त्याच्या अगदी समोरच, जन्गली महाराज मंदिरा शेजारीच पाताळेश्वर लेणी आहे. इथे कोठेही डोंगराळ प्रदेश नाही म्हणून हि लेणी जमिनीखाली खोदली आहे.
लेणीच्या सुरवातीला एक छोटीशी बाग आहे. मुख्य लेणीच्या सुरवातीला प्रशस्त नन्दी सभामंडप दिसतो. येथे सुमारे सहा फूट उंचीची नन्दीची भारदस्त मुर्ती आपले स्वागत करते. नन्तर लेणीच्या मुख्य प्रवेश द्वाराने आत प्रवेश केला कि समोर एक सुंदर शिवमंदिर दिसते.
अत्यंत सुबक आकारात केलेलं खोदकाम, मंदिराच्या प्रवेशद्वारावर केलेलं नक्षीकाम, एका सरळ मार्गात खोदलेले बलदंड खांब हे सर्व पाहून मन तृप्त होते. खरंच असं वाटत नाही कि आपण पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहोत. लेणीच्या बाहेर काही अर्धवट खोदकाम केलेल्या अपूर्ण लेण्यांचे अवशेष दिसतात.
पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार पाताळेश्वर लेणी बेसाल्ट खडकात खोदली असून सुमारे आठव्या शतकातील आहे. आज पाताळेश्वर लेणी सरकार तर्फे एक संरक्षीत स्मारक म्हणून घोषित आहे. जर तुम्हाला पूणे शहराच्या धकाधकीच्या दिनचर्येतून जरा निवांत शांत वेळ व्यथीत करायचा असेल तर पाताळेश्वर लेणी एक उत्तम जागा आहे. इथे या, महादेवाचे दर्शन घ्या, येथे आसपास असलेल्या झाडांच्या सावलीत जरा निवांत बसून प्रफुल्लीत व्हा.