गडासारखा गड पुरंदर दरडी वरती दरड
कड्यावरती कडे त्याच्या वरती कपार
कपारीला धार धारेवर कोट
कोटाच्या आत माची
माचीच्या आत बालेकिल्ला
बालेकिल्ल्याला बुरुज चोवीस
चोवीस बुरुजात शेंदऱ्या बुरुज
बुरुज भिडला आहे आभाळाला
आभाळात भिरभिरतील घारी
अन बालेकिल्ल्यात तळपतील तिखट तलवारी
कोण्या अन्यात कवीने केले हे पुरंदर किल्ल्याचे अत्यन्त सार्थ वर्णन.
पुणे शहरापासून जवळ असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे पुरंदर किल्ला. पुरंदर शिवशाहीच्या इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांचा आदिलशाही सोबत झालेला पहीला मुकाबला, संभाजी महाराजांचा जन्म, मुरारबाजींचा रणझुंजार पराक्रम, मिर्झा राजेंसोबत झालेला तह अशा अनेक गोष्टी पुरंदराने पहिल्या आहेत.
पुणे शहरापासून पुरंदरला जाणे अतिशय सोपे असून एका दिवसाची सहल सहज घडवता येईल. पुण्यापासून अंतर साधारण ५० किलोमीटर आहे. पुण्यातून कात्रज हायवेने बाहेर पडून सातारा मार्गे सरळ पुढे येत जावे. थोड्या वेळाने डाव्या हाताला नारायणपूर फाटा लागेल. हाच फाटा केतकावळे गावातील प्रतिबालाजी मन्दिराकडेही घेऊन जातो. ह्या रस्त्याने सरळ सरळ नारायणपूर गावात यावे. येथील एकमुखी दत्त मन्दिर प्रसिद्ध असून ह्याच मंदिरामागून सरळ रस्ता पुरंदर किल्ल्याकडे घेऊन जातो.
पुरंदर किल्ल्याचे एक सद्य स्थितीतील खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला भारतीय भूदळाच्या ताब्यात आहे. त्यामुळे पुरंदरच्या पहिल्या दरवाज्या पर्यत, प्रथम माची पर्यत उत्तम डांबरी रस्ता आहे. किल्ल्यात जाण्यासाठी सैन्याच्या अधिकाऱ्यांना योग्य ओळखपत्र दाखवल्या शिवाय प्रवेश मिळत नाही. किल्ल्यामध्ये कॅमेरा मोबाईल किंवा इतर फोटोग्राफीचे साहित्य न्यायला मनाई आहे. किल्ल्यात आपल्याला भारतीय भुदलाच्या सैनिकांचा पहारा दिसून येतो.
साधारण अर्ध्या–पाऊण तासाची चढाई केल्यावर आपण पुरंदरच्या सर्वोच्च ठिकाणी, केदारेशवर मंदिरापाशी येतो. रस्त्यात आपल्याला मुररबाजींचा आवेशपूर्ण पुतळा, दोन भक्कम गोमुखी पद्धतीच्या बांधणीचे दरवाजे, तटबंदी, राजवाड्याचे अवशेष आणि काही पाण्याच्या टाक्या दिसून येतात.
पुरंदर किल्ला भारतीय सेनेच्या ताब्यात असल्यामुळे किल्ल्यावर शिस्त व स्वछता प्रामुख्याने दिसून येते. किल्ल्यावर रात्री मुक्कामास परवानगी नाही. संध्याकाळी पाच वाजण्याच्या आधी किल्ल्यातून निघावे असा नियम आहे. तसेच आपल्याला संपूर्ण पुरंदर बघायला परवानगी नाही. किल्ल्याचा काही भाग हा तारेच्या कुंपणाने बंदिस्त केला असून तेथे प्रवेश नाही. पुरंदर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी असलेले शम्भु महादेवाचे केदारेशवर मन्दिर मात्र बघण्यासारखे आहे. तिथून किल्ल्याचा सम्पूर्ण परिसर, बाजूच्या डोगररांगा व इतर किल्ले बघता येतात.
जेव्हा स्वराज्य नुकतेच कोठे उदयाला येत होते तेव्हा स्वराज्यावर पहिले परकीय आक्रमण झाले ते आदिलशाही सरदार फत्तेखान याचे. तेव्हा बलदंड पुरंदरच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी फत्तेखानाला पराभूत केले होते. पहिल्या लढाईतच भरघोस यश मिळाले. स्वराज्याला पहिला विजय मिळवून दिला तो पुरंदराने. स्वराज्याला पहिला राजपुत्र, भावी छत्रपती दिला तो पुरंदराने. मिर्झा जयसिंगच्या स्वारीच्या वेळी स्वराज्य राखले तेही पुरंदरानेच.
आल्याड सोनोरी, पल्याड जेजुरी मध्ये वाहते कर्हा . .
कर्हे काठी पुरंदर शोभे शिवशाहीचा तुरा. .
शिवशाहीच्या इतिहासातील अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेला पुरंदर किल्ला एकदातरी नक्की पहावा.