रायगड जिल्ह्यामध्ये कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखाजवळ वसले आहे रेवदंडा गाव. अरबी समुद्रातून सागरी मार्गे येणारा व्यापारी माल ह्या खाडीतून हिंदुस्थानात परकीय व्यापारी आणत असत. ह्या रेवदंडा गावचे हे भौगोलीक महत्व ओळखुन येथे सन १५२८ मध्ये पोर्तुगीजांनी आपल्या व्यापारी नौकांच्या संरक्षणासाठी रेवदंडा गावाच्या भोवतीने एका बळकट भुईकोट किल्ल्याची उभारणी केली. गावाच्या नावावरूनच किल्ल्याला रेवदंडा हे नाव पडले.सम्पुर्ण किल्ल्याचा परीघ सुमारे पाच किलोमीटर आहे मात्र सद्य स्थितीमध्ये किल्ल्यामधील गावामधील लोकवस्तीमुळे किल्ल्याचे बरेचसे अवशेष नामशेष झाले आहेत. रेवदंडा किल्ल्याची पश्चिम बाजुची तटबंदी थेट समुद्रकिनाऱ्या पर्यत गेली आहे. ह्या ठिकाणी मात्र काही थोडेफार किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटबंदीपर्यत येते.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासुन पश्चिमेकडे सुमारे २० किमी वर रेवदंडा गाव आहे. गावामध्ये प्रवेश करताना काही ठिकाणी थोडेफार पुरातन दगडी बांधकामांचे अवशेष दिसतात. किल्ल्याची तटबंदी फोडुन गावातील मुख्य रहदारीचा रस्ता बनवला आहे. रेवदंडा गावातुन कोर्लाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वाराच्या कमानीवर पोर्तुगीज सैन्याचे युद्धचिन्ह कोरलेले दिसते. आतमध्ये अजून एक छोटा दरवाजा दिसतो. तसेच रेवदंडा गावामध्ये एक पुरातन भुयारी मार्ग देखील आढळतो मात्र सद्य स्थितीमध्ये हा मार्ग पूर्णपणे बुजल्यामुळे भुयारामध्ये उतरता येत नाही.
रेवदंडा गावातील किल्ल्याचे हे अवशेष पाहुन समुद्र किनाऱ्यावर यावे. येथे लांबवर पसरलेली किल्ल्याची तटबंदी दिसते. तटबंदी ओलांडुन किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यास आतमध्ये अनेक बांधकामाच्या पायाचे आणि भिंतींचे अवशेष दिसतात. किल्ल्यामध्ये उभारलेला पोर्तुगीज काळामध्ये बांधलेला एक मोठा मनोरा मात्र त्वरित आपले लक्ष वेधुन घेतो. आजूबाजूच्या समुद्रकिनारपट्टीवर देखरेखीसाठी पोर्तुगीजांनी रेवदंडा किल्ल्यामध्ये सात मजली मनोरा उभारला होता. सध्या मात्र ह्या सात मजल्यांपैकी केवळ पाचच मजले शिल्लक आहेत. सुबक चौकोनी आकार, दगडी बांधकाम, आतुन असलेला चुन्याचा गिलावा, प्रत्येक मजल्यावर चहुबाजूला असलेले कोनाडे हे सर्व पाहुन अंदाज येतो कि आधीच्या काळी ह्या मनोऱ्याचा रुबाब आणि सौन्दर्य असे असेल. पोर्तुगीज काळात ह्या मनोऱ्याच्या सातव्या मजल्यावरून उत्तरेला मुंबई पर्यत आणि पश्चिमेला जनजिऱ्यापर्यत टेहळणी करता येत असे. म्हणुन ह्या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असेही म्हणले जायचे. ह्या मनोऱ्याच्या पायथ्याला एकुण सात तोफा पडलेल्या दिसतात.
पंधराव्या शतकामध्ये बांधलेला रेवदंडा किल्ला प्रदीर्घ काळापर्यत पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिला. १६८३ मध्ये रेवदंड्यावर हल्ला केला मात्र पोर्तुगीजांनी तो चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला. नन्तर मराठ्यांनी किल्ल्याला वेढा देऊन पुर्ण नाकाबंदी केली. तेव्हा पोर्तुगीजांच्या दुसऱ्या तुकडीने मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. तेव्हा फोंडा किल्ल्याच्या बचावासाठी नाईलाजास्तव मराठा सैन्याला वेढा उठवावा लागला. अखेर १८१७ मध्ये रेवदंडा किल्ला आंग्रे घराण्याच्या ताब्यात आला मात्र लगेच १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
आज रेवदंडा किल्ला पाहताना वाईट वाटते एकुण ५ किलोमीटर परीघ असलेल्या ह्या भुईकोट किल्ल्याचे अवशेष आज काही गुंठ्यामध्येच शिल्लक आहेत. किल्ल्याचा बराचसा भूभाग आज खाजगी मालमत्ता असल्यामुळे बरेचसे पुरातन अवशेष आज नामशेष झाले आहेत. जर हाताशी दोन दिवस सुट्टी असेल तर रेवदंडा किल्ल्यासोबत कोर्लाई आणि कुलाबा किल्ल्यांना देखील भेट देता येईल.