पुणे शहराजवळील चाकण शहर आज येथील औद्योगिक वसाहतीमुळे बऱ्याच लोकांना माहित असेल. जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आज चाकण मध्ये उपलब्ध आहेत. पण ह्याच चाकण शहराचा शिवकालीन इतिहासाशी देखील संबंध आहे हे फारच कमी जणांना ठाऊक असेल. तर ह्या चाकण शहराच्या इतिहासात जरा डोकवूयात.
चाकण शहराच्या मध्यभागी आहे संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला. ऐतिहासिक माहिती नुसार ह्या किल्ल्याचा विस्तार एकूण ६५ एकरमध्ये होता हे आज कोणासही खरे वाटणार नाही. कारण आज हा किल्ला कसाबसा काही गुंठ्यामध्ये तग धरून उभा आहे. चाकणच्या मुख्य एसटी स्टँड पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर हा किल्ला असून अगदी शहराच्या मध्यभागी आहे.
किल्ल्याच्या मध्यभागातूनच रहदारीच्या रस्ता आहे. काही बुरुज आणि थोडी तटबंदी शिल्लक आहे. एक पुरातन शंकराचे मन्दिर आहे पण त्याची डागडुजी, रंगकाम केल्यामुळे ते अगदी नवीनच वाटते. किल्ल्याच्या मध्यभागी एक छोटी तोफ ठेवलेली आढळते. किल्ल्याच्या कडेने खंदक असल्याच्या खुणा मात्र दिसून येतात. पूर्ण किल्ला बघायला एखादा तास आरामात पुरतो. आज अशा बिकट परिस्थितीमध्ये असलेला हा भुईकोट शिवकालीन इतिहासात मात्र एका विलक्षण पराक्रमाची साक्ष देतो.
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुरते तीन वर्ष स्वराज्यात तळ ठोकून बसला होता. पण ह्या तीन वर्षात ह्या मामाला सह्याद्रीच्या प्रचंड आणि बेलाग दुर्गांनी चांगलेच मामा बनवले होते. एकही डोंगरी दुर्ग शाहिस्तेखान जिंकू शकला नाही.
म्हणून खानाने आपला मोर्चा वळवला तो चाकणच्या छोटेखानी भुईकोट संग्रामदुर्गाकडे. एकूण २०,००० प्रचंड सैन्य आणि तोफखाना घेऊन खान चाकण कडे निघाला. संग्रामदुर्गावर किल्लेदार होते वयाच्या सत्तरी मध्ये असलेले “तरणेबांड” फिरंगोजी नरसाळा.
किल्ल्यात होते साधारण ३०० मावळे आणि सामना होता खानाच्या २०,००० सेनेसोबत. खानाचे सैन्य येऊन ठेपले. तोफा धडाडु लागल्या. फिरगोजींच्या सोबतीने मावळ्यांनी शिरजोर प्रतिकार केला. खानाचा प्रत्येक हल्ला प्रत्येक डावपेच परतवून लावला. किल्ला जिंकणे तर दूरच पण संग्रामदुर्गाच्या तटबंदीला देखील मोघल सैन्य स्पर्श करू शकले नाही. मावळे मोघलसेनेला पुरून उरत होते. अजूनही संग्रामदूर्ग खानाला वाकुल्या दाखवत होता.
महिना उलटून गेला पण संग्रामदुर्ग काही खानाला वश होईना. इतके दिवस किल्ल्यावर डोके आपटल्यावरती शेवटी खानाच्या डोक्यात एक युक्ती आली. किल्ल्याची तटबंदी सुरुंग लावून उडवून देऊयात. किल्ल्यातील मावळे मात्र याबद्दल पूर्णपणे अन्यात होते. शेवटी एक दिवस जोरात बार झाला, सुरुंग फुटला, तटबंदी कोसळली. तटबंदीवर असलेले मावळे आकाशात फेकले गेले.
किल्ल्याला भगदाड पडले. मोघल सैन्य त्या तटबंदीतून आत शिरू लागले. किल्ल्यातील उर्वरित मावळ्यांनी एकत्र येऊन मोघल सैन्याला अजूनही थोपवून ठेवले होते. फिरंगोजी तर दोन्ही हातात दोन समशेर घेऊन मोघल सेनेवर तुटून पडले होते. प्रत्येक वीर मावळा जणू प्रचंड शिवतांडव करत होता.
तटबंदी फुटल्यांनंतरही एकूण १५ दिवस फिरंगोजींनी किल्ला लढवला. पण जसजसा मोघल सेनेचा जोर वाढत गेला तसा फिरंगोजींना महाराजांचे शब्द आठवले. “गड हातचा गेला तर परत मिळवणे होईल, पण जीव वाचवावा” अखेर फिरंगोजींनी मोघलांपुढे माघार घेतली आणि संग्रामदुर्ग शाहिस्तेखानच्या ताब्यात गेला.
वास्तविक पाहता संग्रामदुर्ग हा एक छोटा भुईकोट किल्ला, जणू एक गढीच. फिरंगोजींकडे सैन्य बळ देखील कमी. भुईकोट किल्ला, कमी सैन्यबळ असूनही एकूण ५५ दिवस संग्रामदुर्ग मोघलांना शरण जात नव्हता. कोठे एका रात्रीत अंधारात छापा घालून डोंगरी किल्ले जिंकणारे आपले वीर मावळे आणि कोठे हे छोट्या भुईकोटवर आपटून आपलेच डोके फोडणारे मोघल सैन्य.
फिरंगोजींनी राजगडी जाऊन महाराजांची भेट घेतली. फिरगोजींना गड गेल्याच दुःख वाटत होतं पण महाराजांनी फिरंगोजींच्या पराक्रमाची तारीफ केली. संग्रामदुर्गाच्या लढाईवेळी महाराज आदिलशाही सरदार सिद्दी जोहर च्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. म्हणून महाराजांकडून फिरंगोजींना कोणतीही मदत मिळाली नाही पण तरीही फिरंगोजी आणि संग्रामदुर्ग मोघलसेनेला पुरून उरले होते.
आज संग्रामदुर्ग जरी बिकट स्थितीत असला तरी एकदा तरी येथे अवश्य भेट द्यावी. तटबंदी जरी ढासळली असली, बुरुज जरी जीर्ण झाला असला तरी इथे आपल्या पूर्वजांनी सत्कार्यासाठी रक्त सांडले होते. हि केवळ दगड धोंडे नसून आमचे प्रेरणास्थान आहे