महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक आहे कोकणातील पाली गावातील श्री क्षेत्र बल्लाळेश्वर. पाली येथील ह्या प्रसिद्ध गणेश मंदिरास अनेक भावीक भेट देत असतातच पण मन्दिरापासूनच हाकेच्या अंतरावरील सरसगड किल्ला देखील दुर्ग भटक्यांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. मंदिराच्या उजव्या हातालाच उभ्या खडकाची एक सरळसोट भिंत दिसते. हा डोंगर म्हणजेच सरसगड किल्ला. गणपती मंदिरापासून पाहिल्यास ह्या डोंगरावर किल्ल्या असल्याचा जरासाही अंदाज येत नाही.
किल्ल्यावर जाण्यासाठी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागे मार्गस्थ होऊन थोडे अंतर डांबरी रस्त्याने चालत जावे. थोडेसे अंतर चालल्यावर डाव्या हाताला एक कच्ची पायवाट दिसते. हीच पायवाट आपल्याला गडावर घेऊन जाते. ह्याच वाटेच्या विरुद्ध दिशेनेही एक रस्ता गडावर जातो मात्र जास्त वापर नसल्याने आणि अगदी उभ्या खडकाची चढण असल्याने तो मार्ग शक्यतो टाळावा.
मन्दिरामागील मार्गाने थोडी चढण थोडी सपाटी असे सुमारे तासभर अंतर कापल्यावर गड नजरेस येतो. हिच सरळसोट वाट चालत राहिल्यास एका खडकपाशी आपण येतो. जरासे सोपे प्रस्तारोहण करून हा साधारण दहा फूट उंचीचा खडक चढवा आणि मग आपल्याला सुंदर आखीव रेखीव पायऱ्या नजरेस पडतात.
पायर्यांची सुरवात जेथे होते तिथेच एक भुयारी मार्ग दिसतो पण तो सध्या पूर्ण बुजवलेला आहे. समोर दिसणार्या सुमारे ९० पायऱ्या आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजापाशी घेऊन जातात. दोन्ही बाजूला किल्ल्याचे बलदंड दुहेरी बुरुज अक्षरशः मान पूर्णपणे मागे झुकवून बघावे लागतात. चढण अगदी सरळ असून उजव्या बाजूला उभी कातळी भिंत आणि डावीकडे जराशी खोल दरी असल्यामुळे जरा जपुन पायर्या चढाव्यात. पावसाळ्यात ह्या पायऱ्या फारच निसरड्या असतात आणि पायऱ्यांवर खेकडे हि असतात. विशेष करून उतरताना जास्त काळजी घ्यावी.
किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे. दोन्ही बाजूला पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. ह्या डाव्या वळणाच्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर आपण गडाच्या प्रथम टप्प्यावर येतो. येथे उजव्या हातास तटबंदीचे अवशेष, डाव्या हाताला एक प्रशस्त खोदीव पाण्याचे टाके, काही लेणी सदृश्य खोदकाम दिसते. ह्याच लेण्यांमध्ये एका शहापिराचे थडगे आणि एक छोटी शिवपिंडी दिसते. ह्या लेण्यांमध्ये सुमारे दहा–बारा लोकांच्या मुक्कमाची सोय होऊ शकते. उजव्या हाताने थोडे अंतर चालल्यावर एक कड्यामध्ये खोदलेले पाण्याचे टाके दिसते. इथले पाणि पिण्यायोग्य आहे. ह्याच टाकीच्या अजून पुढे उजव्या बाजूला डोंगराच्या कड्यामध्ये खोदलेले शस्रागार आणि धान्य कोठाराचे अवशेष दिसतात.
येथून डाव्या हातानेच गडाच्या सर्वोच्च टोकावर बालेकिल्ल्यावर जायला रस्ता आहे. हा रस्ता गर्द झाडी आणि गवतातून आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जातो. वाटेत थोडी सोपी खडकाची चढण आहे. सुमारे अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्यावर येतो. येथे टेहळणी साठी बांधलेले दोन मजबूत बुरुज दिसतात. एक सुंदर पाण्याचे तळे आणि शिवमंदिर आहे. गडावरून पाली गावाचे आणि आजूबाजूच्या निसर्गाचे सुंदर दृश्य दिसते. विलक्षण असलेला तीन कावड्याचा डोंगर अगदी स्पष्ट नजरेस येतो. आकाश साफ असल्यास सुधागड आणि घनगड हे किल्लेही नजरेस येतात.
गडाचा विस्तार फार मोठा नसल्याने गड पहायला एक तास पुरेसा होतो. गडावर मुक्कामाला योग्य जागा असल्यामुळे बरेच ट्रेकर सरसगड आणि सुधागड अशी दोन दिवसाची मोहीम आखतात. श्री बल्लाळेश्वराच्या सान्निध्यात असलेल्या ह्या दुर्गरत्नाला प्रत्येक दुर्गप्रेमीने अवश्य भेट द्यावी.