Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शिवजन्माची पवित्र भूमी – शिवनेरी किल्ला

जुन्नर शहरामध्ये स्थित असलेल्या शिवनेरी किल्ल्यास मराठा साम्राज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे कारण हीच ती पवित्र जागा आहे जिथे त्या युगप्रवर्तक देवमानवाचा जन्म झाला होता. महाराष्ट्रामधील अजिंक्य आणि बळकट किल्ल्यांपैकी एक आहे शिवनेरी. एका बाजूला असलेला सम्पूर्ण उभा सरळसोट नैसर्गिक डोंगरकडा आणि गडामध्ये प्रवेश करण्यासाठी एका मागोमाग एक असे चक्रव्यूहा प्रमाणे सात मजबुत दरवाजे ह्यामुळे शिवनेरी कित्येक वर्ष अभेद्य होता.

Shivneri Fort

शिवनेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर गाठावे. पुणे ते जुन्नर अंतर साधारण ९० किमी असुन साधारण अडीजतीन तासात जुन्नर गाठता येते. जुन्नर शहरापासून शिवनेरीची उंची तशी फार कमी आहे. उत्तम डांबरी सडक असल्यामुळे सरळ आपण प्रथम दरवाजाच्या पायऱ्यांपाशी पोहोचतो. पुढे एकामागे एक असे सलग सात दरवाजे तासाभरात चढुन गडमध्ये प्रवेश होतो. पाचवा दरवाजा ओलांडल्यावर थोडे उजव्या हाताला चालत गेल्यावर शिवाई देवीचे मन्दिर दिसते. जिजाऊंनी ह्याच देवीला, पुत्र व्हावा म्हणुन नवस बोलला होता. मंदिराच्या मागील बाजुस सुमारे सातआठ लेण्या खोदलेल्या दिसतात. ह्या लेण्यामुळे शिवनेरीचे प्राचीनत्व सिद्ध होते. ह्या लेण्या सुमारे सातवाहन राजांच्या काळातील असून नाणे घाटातील आणि लेण्याद्रीच्या लेण्यांच्या समकालीन असाव्यात असा कयास आहे.

सातवा दरवाजा ओलांडून गडमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हातास अंबरखान्याचे अवशेष आणि थोडे अंतर पूढे उजव्या हातास गंगाजमुना ह्या पाण्याच्या टाक्या दिसतात. ह्याच रस्त्याने सरळ पूढे गेल्यावर कोळी लोकांची समाधी, एक ईदगाह आणि अखेर शिवजन्मस्थान दृष्टीस येते. शिवजन्मस्थानाच्या इमारतीची पुनर्बांधणी केल्यामुळे ते उत्तम स्थितीत आहे. ह्या एकमजली इमारतीमध्ये वर जाण्या साठी उत्तम दगडी पायर्यांचा जिना, वरती प्रशस्त खोली, झरोके असलेल्या नक्षीदार खिडक्या, नक्षीदार छत असे उत्तम बांधकाम केलेलं आढळते. तळमजल्यात एक प्रतिकात्मक स्वरूपातील शिवरायांचा पाळणा आणि छोटा पुतळा आहेShivaji Maharaj Birth Place

शिवजन्मस्थानापासून थोडे अंतर पुढे कडेलोटाची जागा आहे. वाटेत काही पाण्याच्या टाक्या दिसतात. मात्र कोणतेही पाणी सध्या पिण्यायोग्य नाही.

शिवजन्म झाल्यानंतर १६३२ साली शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी सोडला. नन्तर किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात कोळी लोकांची वस्ती होती. त्यांनी मोगलांविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला मात्र मोगलांकरवी सर्व कोळी लोकांचा शिरच्छेद करण्यात आला. जुन्नर हि मोगलांची एक प्रमुख व्यापारपेठ होती. शिवाजी महाराजांनी मोघलांविरुद्ध पहिली मोहीम काढली तेव्हा जुन्नर शहराची प्रचंड लूट केली होती मात्र शिवनेरी किल्ला जिंकण्यास अपयश आले. हे शिवशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल कि नन्तर अनेक प्रयत्न करूनही शिवनेरी स्वराज्यात सामील होऊ शकला नाही. पूढे १७१६ साली शाहु महाराजांकरवी शिवनेरी पेशवाईमध्ये शामील झाला.

सध्या मात्र शिवनेरीवर जाण्यासाठी उत्तम गाडीमार्ग असल्यामुळे गडावर जाणे सोपे आहे. जुन्नर गावातुन एक अतिशय अवघड असा साखळीच्या मार्गानेही गडावर जाता येते. डोंगराचा सरळ उभा कडा लोखन्डी साखळी धरून लोखन्डी गजावर पाय रोवुन चढावा लागतो. साहसी गिर्यारोहक शक्यतो ह्या मार्गाचा वापर करतात. मात्र डांबरी रस्ता उत्तम पायर्यांची चढण असल्यामुळे शिवनेरीला पुणे शहरपासून एक छोटी एका दिवसाची कौटुंबिक सहल नक्की आयोजित करता येईल. शिवजन्म झालेल्या ह्या पवित्र किल्ल्याला एकदा अवश्य भेट नक्की द्यावी.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *