Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

बारामोटेची विहीर, लिंब – पुरातन जलव्यवस्थापनेचे एक उत्तम उदाहरण

Bara Motechi vihirछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रातील दुर्गस्थापत्यशास्त्रामध्ये अनेक वैविध्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग केले गेले. याच प्रयोगांपासून प्रेरित होऊन शिवोत्तरकालीन स्थापत्यकारांनी अनेक वाडे, गढी, मंदिरे, विहिरी व इतर अनेक सुंदर वास्तूंची निर्मिती केली. याच कालखंडात बांधलेली अशीच एक सुंदर पुरातन विहीर आजही आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळते सातारा शहरानजीक असलेल्या लिंबगावी. पुणे-सातारा महामार्गावर सुमारे १०० किमी प्रवास केल्यावर, म्हणजेच सातारा शहराच्या सुमारे २० किमी आधी डाव्या बाजूला लिंब गावाचा फाटा आहे. इथून सुमारे ५ किमी प्रवास केल्यावर शेर-लिंब गावामध्ये आपला प्रवेश होतो. दुतर्फा असलेली ऊस-हळदीची शेते, हिरवीगार झाडी  आणि महामार्गाच्या रहदारीपासून अलिप्त असणारे सुंदर ग्रामीण जीवनमान अनुभवत एका छोट्याशा डांबरी मार्गाने ऐतिहासिक बारामोटेच्या विहिरीपर्यंत आपण पोहोचतो.

Bara Motechi vihirविहिरीचे स्थापत्य जवळून निरखून पाहता अचंबित व्हायला होते कि हि केवळ एक विहीरच नसून तर एक छोटासा राजवाडाच आहे. विहिरीमध्ये उरतण्यासाठी मजबूत बांधणीचा प्रशस्त जिना आहे. जिना संपताच एक भव्य, आलिशान कमान आपले स्वागत करते. कमानीच्या बाहेर दोन्ही बाजूस कमळपुष्पे कोरलेली आढळतात. कमळपुष्पांच्या वरील बाजूस मोडी लिपीतील एक शिलालेख दिसतो. कमानीच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला दोन सुंदर शरभशिल्पे कोरलेली दिसतात. कमान ओलांडून पुढे गेल्यावर दोन्ही बाजूस आयताकृती उपविहिरी दिसतात. सद्यस्थितीत मात्र ह्या उपविहीरींमध्ये पाणी दिसत नाही. ह्या उपविहीरींमधूनही पाणी उपसण्यासाठी बांधलेल्या मोटिंचे अवशेष मात्र वरच्या बाजूस प्रकटपणे आढळतात.

Bara Motechi vihirह्या उपविहिरींपासून थोडेसे पुढे गेल्यावर आपण मुख्य विहिरीपाशी पोहोचतो. हि अष्टकोनी मुख्यविहीर असून तिचा व्यास सुमारे ५० फूट असून, खोली ११० फूट आहे. येथून वरील बाजूस निरीक्षण केल्यास चारी बाजूंना चार व्याघ्रशिल्पे कोरलेली आढळतात. विहिरीच्या कठड्यावर असलेले पुरातन दगडी मोटेचे अवशेषही पाहायला मिळतात. विहिरीमध्ये असलेले नितळ थंडगार पाणी आजही मोटरच्या साहाय्याने उपसून वापरात आणले जाते. मुख्य अष्टकोनी विहीर आणि दोन आयताकृती उपविहिरी यांना जोडणारे बांधकाम म्हणजे चक्क एक छोटासा राजवाडाच म्हणावे लागेल. एका छोट्याशा अंधाऱ्या जिन्यातून वरच्या मजल्यावर जाता येते.

Bara Motechi vihir

हि राजमहालाच्या जागा आकाराने छोटी जरी असली तरी येथील नक्षीकाम, कलाकुसर, रंगकाम पाहून आपण थक्क होतो. खिडकीच्या दगडी कमानींवर महिरपीयुक्त सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्याच्या छतावर केलेली कलाकुसर आणि रंगकाम आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. हे छत खांबांवर तोललेले असून प्रत्येक दगडी खांबावर वेगवेगळी शुभशिल्पे कोरलेली आढळतात. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. ह्या छोटेखानी राजमहालाची सर्व सुंदर कलाकुसर डोळ्यात साठवून ठेवावी आणि डाव्या बाजूने असलेल्या जिन्याने महालाच्या छतावर यावे. हे सर्व सुंदर अवशेष पाहून झाल्यावर महालाच्या छतावर आलो कि समोर दिसते ती सिंहासना प्रमाणे बैठकीची जागा. तीन दगडी पायऱ्या चढून वर मुख्य व्यक्तीसाठी बैठकीची सोय केली आहे आणि समोर इतर व्यक्तींना बसण्यासाठी प्रशस्त मोकळी जागा सोडलेली दिसते.

Bara Motechi vihir

अशा ह्या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे शके १६४१ ते १६४६ ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली. मोटिंच्या अवशेषांपाशी पाणी उपसल्यानंतर Bara Motechi vihirसाठवणुकीचा हौद आणि पाणी खेळवण्यासाठी खोदलेले दगडी चर देखील आढळतात. मुख्य अष्टकोनी विहीर आणि दोन उपविहिरींवर असलेल्या मोटेच्या जागा मोजल्यास एकूण पंधरा मोटिंचे अवशेष दिसतात. मात्र आधीच्या काळी केवळ बाराच मोटिंचा वापर होत असे आणि इतर तीन मोटी दुरुस्ती काळामध्ये पर्यायी म्हणून वापरत. म्हणून प्रत्यक्षात पंधरा मोटी असूनही विहिरीचे नाव “बारामोटेची विहीर” असे दृढ झाले. विहिरीच्या बांधमकाचे पूर्ण निरीक्षण केल्यास बांधकामाचा दर्जा आणि बांधकामातील कलात्मकता प्रामुख्याने दिसून येते. ज्या व्यक्तींना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि अभ्यासण्याचा छन्द आहे त्यांनी तर ह्या लिंब गावातील ऐतिहासिक बारामोटेच्या विहिरीला अवश्य भेट द्यावी.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *