शिवकाळाच्या पूर्वीपासून देशमाथ्यावरून कोकणात उतरायला साधारण २४० घाटमार्ग होते. आज ह्यापैकी साधारण ३५-४० मार्ग असे आहेत जिथे गाडी धावु शकते. ह्या सर्व मुख्य घाटमार्गावरून व्यापारी, प्रवासी तसेच शत्रुदेखील देशमाथ्यावर येऊ शकत होता. त्यामुळे अशा घाटमार्गांवर एन मोक्याच्या ठिकाणी गडकोट उभारले जायचे जेणेकरून प्रवाशांना मुक्कामासाठी, व्यापाऱ्यांकडून जकात वसुलीसाठी सोय व्हावी आणि शत्रूला रोखणेही साध्य व्हावे.
लोणावळ्यातून कोकणात उतरायला आधी बोरघाट, उंबरखिंड, आणि सवाष्णींचा घाट ह्या घाटवाटा होत्या. अशाच सवाष्णीच्या घाटावर लक्ष ठेवायला असलेला अतिशय बलदंड असा सुधागड किल्ला. पूर्वीच्या काळी भौगोलिक परिस्थीतीचा वापर करून कशा उत्तम प्रकारे गड किल्ल्यांची संरक्षीत फळी उभारली जायची हे आपल्याला सुधागडावर पहायला मिळते. जरी कधीकाळी शत्रू महाड-पाली मार्गे देशमाथ्यावर चालून येत असेल, तर समोर दिव्य म्हणून उभा असायचा सुधागड. त्याच्या मागोमाग सरसगड, घनगड, तैलबैला, कोरीगड हे सुधागडाचे पाठीराखेहि तैनात असायचे. हि गडकोटांची सुरक्षित फळी आपल्याला सुधागडावरून अनुभवायला मिळते. हे सर्व किल्ले येथून स्पष्ट दिसतात.
सुधागड किल्ल्याला भेट देण्यासाठी अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध पाली तीर्थक्षेत्री यावे. येथून साधारण १५ किलोमीटर पुढे पाच्छापूर गावी यावे. इथून सुधागडावर जायला मळलेली पायवाट आहे. अवघड ठिकाणी लोखंडी शिडीची व्यवस्थाही केली आहे. पाच्छापूर पासून पुढे ठाकूरवाडी गावातून देखील थोडी चढण असलेली सोपी वाट गडावर घेऊन जाते.
सुमारे दीड-दोन तासाच्या चालण्यांनंतर समोर दोन प्रचंड मोठे बुरुज दिसतात. ह्या बुरुजांच्या मधूनच गडावर जायला पायर्यांची वाट आहे. ह्यावाटेने वर गेल्यावर डाव्या हाताला डोंगराच्या कड्यात खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. येथील पाणी पिण्यायोग्य आहे. अजून सुमारे पंधरा मिनटं चालण्याने आपण गडाच्या विस्तीर्ण पठारावर येतो.
सुधागड किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. गड मजबूत करण्यासाठी बांधलेले चिलखती बुरुज, अडगळीत लपलेला चोर दरवाजा, गोमुखी महाद्वार, गडाचे विस्तीर्ण पठार, तलाव, पाण्याच्या असंख्य टाक्या, टकमक टोक, भोराई देवीचे मन्दिर आणि विशेष म्हणजे किल्ल्यावरील साधारण २०० वर्षांपूर्वी बांधलेला, अतिशय सुस्थितीत असलेला एकमजली पंतसचिव वाडा. सध्या इतर किल्ल्यावर फक्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. अशी पूर्णपणे पुरातन ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत पहायला मिळते सुधागडावर. गडावरील चोर दरवाजा मात्र जरूर पहावा. अगदी सराईत चोरलाही सापडणार नाही अशा लीलया पद्धतीने दाट झाडी आणि एका महाकाय बुरजामध्ये लपवला आहे.
सुधागड किल्ला पाहिल्यावर अक्षरशः रायगडाची आठवण येते. त्यामुळे सुधागडला रायगडाची प्रतिकृती देखील म्हणतात. किल्ल्याच्या महाद्वाराचे बांधकाम तर हुबेहूब रायगडाच्या महाद्वाराप्रमाणे आहे. सुधागड किल्ल्यावर भोराई देवीच्या मंदिरात आणि सचिव वाड्यामध्ये मुक्कामाची उत्तम सोय आहे. गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत आणि काही टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे.
सुधागड किल्ल्याचे पुरातन नाव भोराईदेवीच्या स्थानावरून भोरपगड होते. सुमारे १६४८ मध्ये हा गड शिवशाही मध्ये आला. शिवाजी महाराजांनी गडाचे नाव बदलून सुधागड केले. महाराजांनी जेव्हा स्वराज्याची राजधानी राजगडावरून हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुधागड किल्ल्यावर राजधानी स्थापन करण्याबाबत विचार झाला होता. मात्र काही कारणास्तव नवीन राजधानी रायगडावर वसवण्यात आली. नन्तर सुधागडाचा इतिहासात उल्लेख येतो संभाजी राजांच्या काळात. मराठी साम्राज्य नष्ट करायला खुद्द औरंगजेब प्रचंड सेनासागर घेऊन दख्खन मध्ये उतरला होता. तेव्हा औरंगजेबाचा एक मुलगा शहजादा अकबर औरंगजेब वर नाराज होऊन त्याच्या विरोधात होता. संभाजी राजांनी ह्या शहजादा अकबर ला फितवून आपल्या बाजूला वळवून घेतले. ह्या शहजादा अकबर ची आणि संभाजी महाराजांची पहिली भेट सुधागड किल्ल्यावर झाली होती.नन्तर पेशवाईच्या उत्तरार्धात जेव्हा स्थानिक संस्थाने उदयाला येत होती तेव्हा सुधागड किल्ला भोर संस्थानात समाविष्ट झाला.
आजही नवरात्रीमध्ये येथे भोराईदेवीचा उत्सव पायथ्याला राहणाऱ्या गावकरी लोकांकडून साजरा केला जातो. गडकिल्ल्यांच्या उत्तम पारख असलेल्या छत्रपती शिवरायांनी सुधागडाचा राजधानी साठी विचार केला होता. ह्यावरून समजते कि सुधागड किल्ला नक्कीच खास असणार. सुधागड किल्ल्याचे खासपण जाणून घेण्यासाठी एकदातरी सुधागडला भेट द्यावीच. किल्ल्याचे वेगळेपण, भौगोलिक महत्व, किल्ल्याचा बेलगपणा बलदंडपणा येथे येऊनच पहावा.