पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कारण जुन्नर शहरामध्ये असलेला शिवनेरी किल्ला म्हणजे ती पवित्र जागा आहे जिथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. किल्ल्यापर्यंत असलेला उत्तम डांबरी गाडीमार्ग आणि किल्ल्यावर चढण्यासाठी असलेला उत्तम असा पायर्यांचा मार्ग यांमुळे अनेक पर्यटक आणि दुर्गप्रेमी शिवनेरी किल्ल्याला भेट देत असतात. मात्र किल्ल्यापासून अगदीच जवळ आहे तुळजा लेणी नामक बौद्धकालीन लेणी समूह. शिवनेरी किल्ल्याच्या कातळामध्ये देखील अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आढळतात. तुळजा लेणीची निर्मितीदेखील शिवनेरी वरील लेण्यांच्या समकालीनच असावी.
तर अशा ह्या काहीशा अविख्यात मात्र सुंदर अशा तुळजा लेणी समूहाला भेट देण्यासाठी जुन्नर शहरातून सोमटवाडी-दर्या घाटाकडे जाणारा मार्ग पकडावा. शहरातील मुख्य चौकापासून थोडेसेच अंतर पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला वरसुबाई देवीचे छोटेसे मंदिर दिसते. मंदिरापासून डांबरी मार्गाने अजून थोडेसेच अंतर पुढे गेल्यावर उजव्याबाजूला एक कच्चा रस्ता दिसतो, त्या रस्त्याकडे वळावे. ह्या कच्च्या रस्त्याने सुमारे अडीज किमी सरळ गेल्यावर आपण थेट तुळजा लेणीच्या डोंगराच्या पायथ्याला येऊन पोहोचतो.
डोंगराच्या साधारण मध्यभागी असलेल्या आडव्या कातळावर कोरलेल्या लेण्या पायथ्यापासूनच नजरेस येतात. पायथ्यापासून मळलेली सरळसोट पायवाट आपल्याला थेट लेणी समूहापर्यंत घेऊन जाते. लेणी समूहाची पायथ्यापासून जास्त उंची नसल्यामुळे केवळ ५-१० मिनिटांमध्ये आपण लेण्यांपाशी पोहोचतो. जिथून आपला लेणीसमूहापाशी प्रवेश होतो त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस बऱ्याचवेळा मधमाशांची पोळी लगडलेली असतात आणि काही मधमाशा येथे घोंघावतही असतात. तरी लेणी समूह बघताना काळजी बाळगावी.
तुळजा लेणी समूहामध्ये एकूण १२ विहार, एक चैत्यगृह आणि दोन पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आढळतात. तुळजा लेणी समुहामधील चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तुपाची रचना आवर्जून पाहण्यासारखी आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या लेणी समूहामध्ये जिथे स्तूप कोरलेला असतो तिथे स्तूपाच्या दोन्ही बाजूस समांतर असे स्तंभ कोरलेले आढळतात. मात्र येथील स्तूप ह्या रचनेला अपवाद आहे. इथे चैत्यगृहामध्ये कोरलेल्या स्तूपाच्या चहुबाजूने गोलाकारामध्ये स्तंभ कोरले आहेत. सुमारे ११ फूट उंचीचे एकूण बारा स्तंभ मुख्य स्तूपाच्या सभोवती कोरलेले दिसतात.
दगडी स्तूपाचा बाह्यभाग योग्यरितीने तासून अगदी गुळगुळीत केलेला आहे. स्तूपाचा आकार गोलाकार असून बाजूने असलेल्या प्रत्येक स्तंभाचा आकार अष्टकोनी आहे. आजमितीस महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे औरंगाबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये बहुतकरून बौद्धलेण्या आढळतात. अजिंठा, कार्ला, बेडसे, भाजे या ठिकाणी असलेल्या लेणी समूहांमध्ये तुळजा लेणी पेक्षाहि अतिशय विशाल असे स्तूप कोरलेले दिसतात. मात्र अशी सभोवती गोलाकार स्तंभ असलेली दुर्मिळ स्तूपरचना तुम्हाला केवळ तुळजा लेणीमध्येच अनुभवायला मिळेल.
यांखेरीज लेणी समूहामध्ये एकूण १२ विहार कोरले आहेत. काही विहार हे कोठारांच्या स्वरूपात असून काही विहार हे बैठकीच्या योजनेनुसार आहेत. पुरातन काळामध्ये बौद्धधर्म प्रचारकांना तसेच इथे मुक्कामी येणाऱ्या प्रवाशांना विसाव्यासाठी विहाराच्या आत-बाहेर कोरलेले दगडी बाक दिसतात. पुरातन काळी ह्या विहारांना बंदिस्त करण्यासाठी लाकडी दरवाजे वापरत. ह्या दरवाजांच्या कडी-कोयंड्यासाठीच्या दगडी खोबण्यादेखील काही विहारांचा चौकटींपाशी दिसतात. पाण्याच्या सोयीसाठी दोन खोदीव टाक्यांची रचना केलेली दिसते. टाक्यांपर्यंत जाण्यासाठी खोदीव पायर्यांचा मार्ग बनवलेला दिसतो.
काही विहारांच्या छतावर बाह्यबाजूने कोरलेली वेलबुट्टीदार नक्षी देखील आवर्जून पाहण्यासारखी आहे. ह्या नक्षीकामामध्ये छ्त्रीसहित असलेले छोटे बौद्धस्तूप, विहारांना असलेले अर्धवर्तुळाकार नक्षीदार झरोके, गंधर्व-किन्नर, मेदीका आणि फुलं-पानांच्या नक्षीचे कोरीवकाम दिसते. एकूण १२ विहारांपैकी चौथ्या विहारामध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती स्थापन केली असल्यामुळे ह्या लेणी समूहाला तुळजा लेणी हे नाव रूढ झाले आहे.
तुळजा लेणी पासून शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मठीकाण आणि कडेलोटाची जागा अगदी सहज दृष्टिक्षेपास येते. शिवनेरी किल्ल्यावर अनेक पर्यटक आणि दुर्गप्रेमींची गर्दी नेहमीच असते मात्र किल्ल्यापासून अगदी जवळ असलेले हे सुंदर शिल्परत्न आजही हौशी पर्यटकांना फारसे माहित नाही. खरेतर तुळजा लेणीची पायथ्यापासून असलेली कमी उंची आणि सोपी चढण असल्यामुळे शिवनेरी किल्ल्यासोबत तुळजा लेणी असा एका दिवसाचा सहकुटुंब बेत आखणे सहज शक्य आहे.