Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

बोरघाटाचा पुरातन रखवालदार – तुंग किल्ला

महाराष्ट्रामध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे निसर्गसौन्दर्याने ओतप्रोत भरलेली भरलेली खाणच. लोणावळा सारखे विख्यात थंड हवेचे ठिकाण, भोवताली असलेल्या डोंगररांगा, अनेक लहानमोठी धरणे, घनदाट अरण्ये, ऐतिहासिक गडकोट, बौद्ध कालीन लेण्या, पुरातन मंदिरे अशी अनेक ठिकाणे मावळ तालुक्यामध्ये बघायला मिळतील. विशेषतः पावसाळ्यामध्ये तर ह्या जागांच्या सौन्दर्यावर निसर्गाचा विलोभनीय साज चढल्यावर यांचे सौन्दर्य शतपटीने वाढते. दुधडी Tung-Fortभरून वाहणाऱ्या नद्या, घनदाट धुके आणि हिरवाईचा सुंदर शालू पांघरलेले उंच डोंगर पाहून मन तृप्त होते. असेच एक मावळातील सुंदर ठिकाण म्हणजे पवना नदीवर बांधलेले पवना धरण. पवना धरणाला भेट दिल्यास आजूबाजूला असलेल्या डोंगररांगांमध्ये एक विशिष्ट आकार असलेला शंकुकृती डोंगर नेहमीच आपले लक्ष वेधून घेतो. हा डोंगर म्हणजेच पवन मावळचे संरक्षण करणारा, बोरघाटाचा पहारेकरी तुंग किल्ला.

लोणावळा शहरापासून लायन्स पॉईंट जाणारा रस्ता पकडावा. लायन्स पॉईंट ओलांडल्यावर थोड्याच वेळाने डावीकडे लागतो घुसळखांब फाटा आणि ह्या फाट्याकडे वळल्यास थोडेच अंतर पुढे आहे पायथ्याचे तुंगवाडी गाव. लोणावळा ते तुंगवाडी हा प्रवास सुमारे अर्ध्या तासाचा आहे. पायथ्याला असलेल्या तुंगवाडी गावापासून कमी उंची आणि सोपी चढण असल्याने दुर्गप्रेमींसोबत अनेक हौशी Tung-Fort-Entranceपर्यटक देखील तुंग किल्ल्यास भेट देत असतात. सुमारे अर्ध्या-पाऊण तासात गडमाथ्यावर आपला प्रवेश होतो. एका मागोमाग एक असे दोन भक्कम दरवाजे ओलांडावे लागतात. प्रथम दरवाजाच्या बाजूने लांबपर्यंत तटबंदी आणि शेवटी बुरुज बांधून किल्ल्याला संरक्षण दिले आहे. द्वितीय दरवाजा हा गोमुखी प्रकारातील डाव्या वळणाचा असून बाहेर एक हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते. गडमाथ्यावर प्रवेश करताच उजव्या बाजूस एक छोटेसे गणपती मंदिर आहे. मन्दिराजवळच सदरेचे आणि इतर बांधकामाच्या पायाचे अवशेष दिसतात. गणपती मंदिराच्या मागील बाजूस सपाटीवर खोदलेले एक प्रशस्त टाके आहे. टाकीमध्ये उतरायला पायऱ्या देखील खोदलेल्या दिसतात मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नाही. गणपती मंदिराच्या मागील बाजूस एक छोटासा सुळका दिसतो. सुळक्याच्या पायाशी देखील काही पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतात. यांपैकी काही टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे.

सुळक्याच्या टोकावर जाण्यासाठी उत्तम मळलेली, काहीशी खडी चढण असलेली मात्र छोटीशी पाऊलवाट आहे. तरी हि वाट जरा जपून चढावी. सुळक्याच्या माथ्यावर तुंगीदेवीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एक भूमिगत खोदलेली गुहा असून गुहेला बाहेर टेहळणीसाठी एक छोटासा झरोका देखील दिसतो. गुहा फार प्रशस्त नसली तरी पावसाळा व्यतिरिकीय इतर ऋतूमध्ये येथे ३-४ जणांना मुक्काम करता येऊ शकतो. सुळक्यावरून खाली तुंगकिल्ल्याचा सम्पूर्ण विस्तार आणि आजूबाजूच्या परिसरातील पवनमावळचे सौन्दर्य देखील न्याहाळता येते. पवना धरणाचा विस्तृत जलाशय तसेच तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्लेदेखील येथून स्पष्ट नजरेस येतात.

इतिहासामध्ये तुंग किल्ल्याचा विशेष करून उल्लेख आढळत नाही. १६५७ साली मावळ प्रांत स्वराज्यात शामिल झाला. १६६० साली नेताजी पालकरांना ह्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त केले होते. मे, १६५५ साली मिर्झा जयसिंग आणि दलेरखान यांनी स्वराज्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये ह्या परिसरावर हल्ला केला. अनेक गावे जाळली, विध्व्न्स केला मात्र तुंग तिकोना सारखे गडकोट मात्र त्यांना जिंकता आले नाहीत. अखेर जून, १६५५ साली पुरंदरच्या तहामध्ये हा प्रांत व गडकोट मोघलांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढे पुरंदरचा तह मोडल्यानन्तर सर्व गडकोट आणि मावळ प्रांत पुन्हा स्वराज्यात शामिल झाला.

लोणावळा ह्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणापासून जवळ असल्यामुळे तुंग किल्ला पुणे-मुंबई च्या पर्यटकांना बऱ्यापैकी माहित आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये तर ह्या परिसरातील किल्ल्यांवर फार मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. दुर्गप्रेमींनी वेळेचे उत्तम नियोजन केल्यास तुंग-तिकोना-कोरीगड-लोहगड-विसापूर हे पाच किल्ले दोन दिवसात  सहज पाहता येतील.

लिखाण आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करा !

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *