श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी स्वराज्यामध्ये सुमारे साडे तीनशे किल्ले शामील असल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्ताऐवजामध्ये आढळतो. मात्र यांपैकी काही असे निवडक किल्ले नशीबवान होते ज्यांना शिवाजी महाराजांची सोबत अनुभवायचा बहुमान मिळाला. शिवनेरी, प्रबळगड आणि माहुली ह्या ठिकाणी महाराजांचे बालपण गेले. राजगड, रायगड हे तर राजधानीचे किल्ले. तसेच अफजलखानाच्या मोहिमेवेळी प्रतापगड, सिद्दी जोहरच्या मोहिमेवेळी पन्हाळा ह्या गडांवर महाराजांचा मुक्काम होता. सातारा शहरातील अजिंक्यतारा, संगमनेर जवळील पट्टागड ह्या गडांनी आजारपणात महाराजांना साथ दिली. असाच एक भाग्यवान किल्ला आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये वर्धनगड, जिथे शिवाजी महाराजांचा चरणस्पर्श झाला आहे.
सातारा आणि पुणे दोन्ही शहरापासुन वर्धनगडला एका दिवसात भेट देणे सहज शक्य आहे. सातारा पासून अंतर आहे सुमारे ३० किमी आणि पुण्यापासुन सुमारे १३५ किमी. सातारा-पंढरपूर महामार्गावर कोरेगाव गावाच्या १० किमी पुढे रस्त्याच्या बाजूलाच किल्ला नजरेस येतो. किल्ल्याची तटबंदी व बुरुज महामार्गावरूनहि स्पष्ट दिसते. वर्धनगडाच्या पायथ्या पर्यत उत्तम डांबरी गाडी मार्ग आहे. गावाच्या प्रवेश कमानीपाशी ठेवलेल्या दोन तोफा आपले स्वागत करतात. मुळातच किल्ल्याची उंची कमी आणि गावकऱ्यांनी देणगी व श्रमदानाने सुमारे निम्म्या चढणीपर्यत उत्तम सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. त्यामुळे वर्धनगडाची चढाई फार सोपी व सुखकर झाली आहे.
डाव्या वळणाच्या गोमुखी प्रवेशद्वाराने गडामध्ये आपला प्रवेश होतो. प्रवेशद्वाराची भक्कम कमान, दोन्ही बाजूचे बुरुज, तटबंदी, पहारेकर्यांसाठी बांधलेली देवडी हे सर्व अवशेष अजूनही सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारापासून आत थोड्याच अंतरावर एका मोठ्या बुरुजाच्या मधोमध दिमाखात फडकणार भगवा ध्वज दिसतो. इथून सलग तीन बुरुज ओलांडून पुढे गेल्यावर तटाखाली बनवलेला एक छोटा चोर दरवाजा दिसतो. चोर दरवाजातून गडाखाली उतरायला मळलेली पायवाट नाही तरीही अनुभवी दुर्गभटक्यांनी साहस केल्यास इथूनही गडपायथा गाठणे शक्य आहे.
गडाच्या मध्यभागी सर्वोच्च ठिकाणी वर्धनी मातेचे मन्दिर आहे. स्थानिक गावकऱ्यांनी मंदिराची उत्तम डागडुजी केल्यामुळे मन्दिर लगेच आपले लक्ष वेधून घेते. गडावरील सर्व दुर्गावशेष ह्या मन्दिराच्याच आसपासच आहेत. ध्वजस्तंभापासून मन्दिरापर्यत जाताना वाटेत उजव्या हाताला एक खोदीव तलाव आहे. तलावाच्या वरील बाजूला एक छोटे शिवमंदिर दिसते. मंदिरामध्ये दोन शिवपिंडी असून एक गणेशमूर्ती आणि एक विष्णूची मूर्ती देखील दिसते. मंदिराबाहेर अजून एक भग्न शिवपिंड आहे. शिवमन्दिराजवळच एक खोदीव पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या वरील बाजूस एक छोटे हनुमानाचे मन्दिर आहे आणि इथून समोरच असलेल्या टेकाडावर वर्धनी मातेचे उत्तम मन्दिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस थोडे अंतर खाली उतरल्यावर खडकात खोदीव दोन पाण्याच्या टाक्या आहेत. हाती पुरेसा वेळ असल्यास वर्धनगडाच्या चौफेर फिरत शाबूत असलेली तटबंदी, बुरुज, जंग्या, झरोके हे सर्व अनुभवता येते.
१६५९ साली अफजल वधानन्तर शिवाजी महाराजांनी वर्धनगड किल्ल्याची बांधणी केली. १२ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर १६६१ ह्या महिनाभराच्या काळात शिवाजी महाराज येथे मुक्कामी होते. नन्तरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मे १७०१ मध्ये औरंगजेब बादशहाची छावणी वर्धनगडाजवळ खटाव येथे होते. गडाच्या किल्लेदाराला संभाव्य धोक्याची शक्यता आली. त्याने आपला वकील मोघल सरदार फत्तेउल्लाखान याकडे पाठवून आपण किल्ला ताब्यात देण्यास तयार आहोत असा सन्देश पाठवला. मोघल सैन्याला गाफील बनवून किल्ल्यापासून दूर ठेवणे आणि किल्ल्यावर सैन्याची जमवाजमव करण्यासाठी हि वेळकाढू योजना किल्लेदाराने आखली होती. अर्धा जून महिना ओलांडूनही मराठे वर्धनगड ताब्यात देईनात म्हणुन संतापून अखेर फत्तेउल्लाखानाने गडावर हल्ला चढवला. मराठ्यांनी पण तोडीस तोड प्रत्युत्तर दिले मात्र अखेर २२ जून ला वर्धनगड मोघलांच्या ताब्यात गेला. मोघल अधिकाऱ्यांना किल्ल्यावर पंच्याहत्तर मण धान्य, चाळीस मण शिसे व दारुगोळा आणि सहा मोठ्या तोफा मिळाल्या. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव सादिकगड असे ठेवले. १७०४ साली तीन वर्षांनी लगेच मराठ्यांनी वर्धनगड मोगलांकडून हिसकावून घेतला.
पायथ्या पर्यत उत्तम डांबरी मार्ग आणि निम्म्या चढणीपर्यत असलेला उत्तम पायऱ्यांचा मार्ग यामुळे सद्यस्थितीमध्ये वर्धनगडाला भेट देणे सहज सोपे बनले आहे. स्वतःचे वाहन असल्यास वेळेचे योग्य नियोजन करून वर्धनगड जवळील महिमानगड, वारुगड हे किल्लेही एका दिवसात पाहणे सहज शक्य आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे दुर्गरत्न प्रत्येक इतिहासप्रेमीने अवश्य पहावे आणि ह्या पवित्र नशीबवान दुर्गास नतमस्तक व्हावे.