एखाद्या दुर्गाच्या चहुबाजूने असलेले निबिड घनदाट अरण्य म्हणजे त्या दुर्गाला लाभलेले नैसर्गिक संरक्षणच म्हणावे लागेल. असाच एक कोयना अभयारण्यातील बेलाग, बलदंड गड म्हणजे वासोटा किल्ला. आजही वासोट्याच्या आजूबाजूच्या जन्गलामधे अनेक रानगवे, अस्वले आढळतात आणि कधी कधी बिबट्याचेही दर्शन होते. आज हे वनक्षेत्र कोयना अभयारण्य म्हणून घोषित केल्यामुळे येथील जीवसृष्टी आणि वनसौन्दर्य अबाधित आहे.
वासोट्याला भेट देण्यासाठी सातारा पासून आणि कोकणातून चिपळूण पासून असे दोन मार्ग आहेत. निसर्गसौन्दर्याचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा असेल तर सातारा मार्गे वासोट्याला जाणे जास्त उत्तम ठरेल. सातारा शहरात पोहोचल्यावर कास पठाराकडे जाणारा रस्ता पकडावा. कास पठार पार करून पुढे तोच रस्ता आपल्याला बामणोली गावात घेऊन जातो. ह्या गावातुन वासोट्याच्या पायथ्याला जाण्यासाठी कोयना जलाशयातून सुमारे दीड तास बोटीने प्रवास करावा लागतो. सकाळी साडेआठ पासून बामणोली मधुन बोटी सुरु होतात. घनदाट वृक्षांनी आच्छादित उंच डोंगरांच्या मधुन हा विहंगम जलप्रवास करत आपण कोयना अभयारण्याचा प्रवेशकमानी पाशी पोहोचतो.
समोरच अभयारण्याचे कार्यालय आहे. इथे प्रवेशफी आणि प्लास्टिकच्या बाटल्यांची अमानत रक्कम भरून कार्यालयाच्या मागील पायवाट पकडावी. थोडे अंतर चालल्यावर एका ओढ्या शेजारी गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती दिसते. दगडांमध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या, सुमारे दोन फूट उंचीच्या ह्या मुर्त्या अश्या उघड्यावर पाहुन वाईट वाटते. ह्या देवतांचा आशीर्वाद घेऊन समोर दिसणारी प्रशस्त पायवाट पकडावी. हा सम्पूर्ण प्रवास घनदाट अरण्यातून, उंच झाडांच्या सावलीतून असल्यामुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. वातावरण देखील थंड असते.
काहीशी चढण काहीशी सपाटी अशी सुमारे दोन तास पायपीट झाल्या नन्तर मुख्य पायवाटेला दोन फाटे फुटतात. ह्या पैकी डावीकडील वाट वासोटा किल्ल्याकडे घेऊन जाते तर उजबीकडील वाट नागेश्वर गुहेकडे जाते. वासोटा गडासोबत नागेश्वर गुहा बघायला हाती पुरेसा वेळ असावा कारण अभयारण्याच्या नियमानुसार संध्याकाळी पाचच्या आधी परिसरातून निघणे बंधनकारक आहे. तरी डावीकडील वाटेने सुमारे १५-२० मिनिटांच्या चढणीनन्तर खडकामध्ये खोदीव पायर्यांच्या मार्गाने आपण वासोटा किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळले असुन कडेचे बुरुज, थोडीशी तटबंदी आणि देवड्यांचे काही अवशेष मात्र शिल्लक आहेत.
गडामध्ये प्रवेश केल्यावर समोरच एक मोठं पाण्याचे टाके दिसते. टाक्यांमध्ये उतरायला खोदीव पायऱ्या आहेत. चहुबाजूने बांधलेल्या भिंती आणि विशेष म्हणजे पायर्यांच्या समोरच दिसणाऱ्या भिंतीत मध्यभागी एका कोनाड्यामधे एक मूर्ती दिसते. पाणी कमी असेल तरच हि मूर्ती दिसू शकते. मूर्तीची पाण्यामुळे झीज झाल्यामुळे मूर्ती नक्की कोणती हे समजत नाही. मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या डाव्या बाजूला एक बिनाछप्परचे हनुमानाचे मन्दिर आहे. मंदिराच्या बाहेर एक छोटासा ओटा, पायऱ्या चढुन आत गेल्यावर सुमारे पाच फूट उंचीची मारुतीची सुंदर मूर्ती दिसते. मंदिराच्या आजूबाजूला काही पुरातन बांधमकामाचे अवशेष दिसतात.
मारुती मंदिरासमोर आणि मंदिरामागे अशा दोन पायवाटा येथे दिसतात. प्रथम समोरील पायवाट पकडावी. हि वाट आपल्याला एका सरळसोट माचीवर नेऊन जाते. वाटेमध्ये वासोटा किल्ल्यावरील एक सुंदर वास्तु, एक शिवमंदिर दिसते. पूर्णपणे सुस्थितीत असलेले, बाहेर छोटासा ओटा, आतमध्ये सुबक छोटेखानी सभामंडप, सभामंडपामध्ये प्रवेशासाठी तीन बाजूने तीन दरवाजे, आत प्रशस्त गाभारा, गाभाऱ्यात सुंदर शिवपिंड, वरती चहुबाजूने नक्षीकाम केलेले छोटे कळस, मध्यभागी मुख्य भलामोठा घुमटाकार कळस आणि वरती फडकणार भगवा झेंडा. मंदिराची हि अप्रतिम बांधणी पाहून डोळे तृप्त होतात. शीवमन्दिराच्या शेजारी पुरातन खोलीचे बांधकाम दिसते. छप्पर उडाले आहे मात्र ह्या प्रशस्त खोलीमध्ये प्रवेश करायला तिन्ही बाजूला दरवाजे आहेत. सुमारे बारा फूट उंचीच्या चहुबाजूने भिंती आहेत. भिंतीमध्ये दिवे ठेवण्यासाठी बनवलेले कोनाडेदेखील दिसतात. किल्ल्याच्या मध्यभागी आणि मंदिराशेजारी हे बांधकाम असल्यामुळे हे दारूगोळ्याचे कोठार नसावे. गडावरील शिबंदीसाठी राहण्याची जागा अथवा धान्यकोठार असावे.
शिवमन्दिरापासून थोडेसे अंतर पुढे चालल्यावर गडाची माची नजरेस पडते. माचीच्या टोकावर पोहोचल्यावर नागेश्वराची गुहा, आजूबाजूचे जन्गल आणि अनेक लहानमोठे डोंगर दिसतात. माचीच्या आजूबाजूने अनेक बुरजांचे आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. लांबून माचीचा आकार पाहिल्यास लोह्गडावरील विंचुकाट्याची आठवण येते. येथून गडाच्या विरुद्ध दिशेला जुना वासोटा नावाचा एक भला मोठा डोंगर दिसतो. असे सान्गितले जाते कि वासोटा किल्ला बांधण्याच्या आधी जुना वासोटा ह्या ठिकाणी किल्ला होता. मात्र आत्ता जुन्या वासोट्याला जायला मार्ग उपलब्ध नाही आणि तिथे खूप घनदाट अरण्य असल्यामुळे अनेक हिंस्त्र श्वापदे देखील आहेत.
वासोटा किल्ल्याचा इतिहास अगदी वसिष्ठ ऋषींपर्यत आपल्याला घेऊन जातो. वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य येथे अनेक वर्ष तपश्चर्या करीत असे म्हणून त्याने ह्या जागेला आपल्या गुरुचे नाव दिले आणि नन्तर अपभ्रन्श होऊन डोंगरास वासोटा नाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरेंचे पारिपत्य करून जावळी परिसरातील अनेक छोटेमोठे किल्ले ताब्यात घेतले. मात्र वासोटा किल्ला आडबाजूला अरण्यात असल्यामुळे जिंकता आला नाही. नन्तर शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले असताना महाराजांच्या पायदळाने वासोटा किल्ला जिंकला.
वासोटा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे नवीन नाव दिले. शीवकाळात वासोटा किल्ल्याचा उपयोग कैदीखाना म्हणूनही केला जात असे. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात असताना महाराजांशी झालेला तह मोडुन इंग्रजांनी सिद्दी जोहरला सामील होऊन महाराजांविरुद्ध तोफा डागल्या होत्या. नन्तर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम काढून अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना वासोटा किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. गडाचा विस्तार, सपाट पठार आणि पाण्याची मुबलकता पाहता गडावर लोकांचा बऱ्यापैकी राबता असावा.
वासोटा किल्ल्यास भेट दिल्यावर, त्याचे भौगोलिक स्थान जाणून घेतल्यावर महाराजांनी ठेवलेले व्याघ्रगड हे नाव अतिशय समर्पक वाटते. चहुबाजूने घनदाट अरण्य, आजुबाजुला असलेले अनेक बुलंद डोंगर आणि यांच्या मधोमध एका ढाण्या वाघासारखा ठाण मांडुन बसलेला आडदांड वनदुर्ग वासोटा गड. सद्य स्थितीमध्ये कोयना धरणाच्या जलाशयामुळे गडाच्या सौन्दर्यत अजूनच भर पडली आहे. जलसौन्दर्य, वनसौन्दर्य आणि गिरीसौन्दर्य असे तिहेरी सौन्दर्याची उधळण करणारा वासोटा किल्ला एकदा तरी अवश्य पहावा.